लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या सॉफ्टवेअर क्षेत्रात इंजिनियर असलेल्या वेदांग ज्योती जयंत शास्त्री यांनी गौरी गणपती उत्सव निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील मंदिराची आकर्षक प्रतिकृती घरगुती सजावटीच्या माध्यमातून साकारली आहे. विशेष म्हणजे पर्यावरणाची काळजी घेत हा संपूर्ण देखावा प्रामुख्याने पुठ्ठा, लाकूड, चिपाड, टिश्यू पेपर आणि शाडूची माती यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार करण्यात आला असून यामुळे लातूरच्या वेदांग शास्त्री यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ मानली जाते. मंदिरातील अष्टभुजा महिषासुरमर्दिनी स्वरूपातील देवीची मूर्ती हे प्रमुख श्रद्धास्थान आहे. मंदिर परिसरातील गोमुख तीर्थ, कल्लोळ तीर्थ, दीपमाळ आणि गोंधळाची पारंपरिक संस्कृती यांनाही या देखाव्यात विशेष स्थान देण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक साहित्याचा कल्पक वापर
देवीच्या आराधनेशी जोडलेली महाराष्ट्राची पारंपरिक गोंधळ परंपरा आणि संबळ वाद्य, तसेच मंदिराबाहेरील हळद-कुंकू, ओटी, परडी व इतर पूजेच्या साहित्याची दुकानेही प्रतिकृतीमध्ये साकारण्यात आली आहेत. त्यामुळे हा देखावा केवळ मंदिराची प्रतिकृती न राहता तुळजापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परिसराचे लघुरूप साकारण्याचा एक सुंदर प्रयत्न ठरला आहे. पर्यावरणपूरक साहित्याचा कल्पक वापर, मंदिर परिसरातील प्रमुख स्थळांचे बारकावे आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा देखावा विशेष लक्ष वेधून घेत आहे.
एक महिन्यात पूर्ण देखावा केला
केवळ मंदिराची प्रतिकृती न उभारता तुळजापूर मंदिर परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्येही या देखाव्यात बारकाईने साकारण्यात आली आहेत. यामध्ये श्री तुळजाभवानी देवीचे सिंहासन व गाभारा, मुख्य महाद्वार, गोमुख तीर्थ, कल्लोळ तीर्थ, दीपमाळ, गोंधळ कट्टा, गोंधळी व संबळ, चिंतामणी तसेच मंदिराबाहेरील पूजा साहित्याची दुकाने आणि देवीची परडी अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हा संपूर्ण देखावा साकारण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला असून, त्यामागे सातत्यपूर्ण मेहनत आणि बारकाईने केलेले काम आहे, असे वेदांग शास्त्री यांनी सांगितले. हा देखावा उभारण्यासाठी त्यांच्या पत्नी सौ. डॉ. वैष्णवी शास्त्री, तसेच आई-वडील प्रा. जयंत शास्त्री आणि ज्योती शास्त्री यांनीही मोलाची मदत व सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
















