लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जाहीर केली आहे.
अर्ज स्वीकृतीसाठी विशेष व्यवस्था इच्छुक उमेदवारांचे अर्ज काँग्रेस भवन, लातूर येथे दि. १५ ते २३ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने एका विशेष समितीची स्थापना केली आहे. या समितीकडे अर्ज स्वीकारण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असून या समितीत बालाप्रसाद बिदादा, दगडूआप्पा मिटकरी, नामदेव इगे, रफीक सय्यद, प्रा. सिद्राम कटारे, प्रा. प्रवीण कांबळे, संजय निलेगावकर, मनोज देशमुख या प्रमुख पदाधिका-यांचा समावेश आहे. हे सर्व पदाधिकारी काँग्रेस भवन येथे सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत उपस्थित राहून सर्व इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारतील आणि पक्षाच्या निवडणूक तयारीतील महत्त्वपूर्ण टप्प्याची पूर्तता करतील.
या संपूर्ण प्रक्रियेची माहिती लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातील उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

