मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासन ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरण राबवित आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या समस्या निकालात काढण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक फायदेशीर आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्रातही विविध देशांतील उत्कृष्ट विद्यापीठांसोबत भागीदारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार होत आहे. राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हॉटेल ताज पॅलेस येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ब्रिटिश शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक, वातावरण, पायाभूत सुविधा आणि भावी विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली.
ज्याप्रमाणे लंडन म्हणजे यूकेची ओळख आहे, त्याचप्रमाणे मुंबई म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे भारत अशी ओळख असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळे उद्योग परवाने मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. गुंतवणूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली असून दर महिन्याला त्याचा आढावा घेतला जातो. राज्यात उद्योग, वित्त, शिक्षण, नगरविकास आणि तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांत गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
देशाच्या शिक्षण क्षेत्रात नवे धोरण राबविले असून परदेशी विद्यापीठांसाठी प्रवेशद्वार खुले केले आहे. त्या अंतर्गत राज्यात नवी मुंबई येथे ‘एज्यु सिटी’ उभारण्यात येत आहे, ज्यामध्ये लंडन विद्यापीठाचा कॅम्पस असणार असून येथे दोन हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ, सी-लिंक आणि ‘तिसरी मुंबई’ या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात आधुनिक शहरी विकास होत आहे. वाढवण बंदर विकसित केले जात असून याठिकाणी बुलेट ट्रेन स्थानक आणि ग्रीन इंडस्ट्रियल झोनच्या माध्यमातून हा परिसर ‘चौथी मुंबई’ म्हणून विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

