रोम : वृत्तसंस्था
इटलीमध्ये जॉर्जियो मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशभरात बुरखा आणि निकाबवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे. इटलीच्या सत्ताधारी ब्रदर्स ऑफ इटली पक्षाने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणारे कपडे घालण्यास बंदी घालण्यासाठी संसदेत एक विधेयक मांडले आहे. या विधेयकानुसार, दुकाने, शाळा, विद्यापीठे आणि कार्यालये यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणी चेहरा पूर्णपणे झाकणारे कपडे घालण्यास बंदी घालण्यात येणार आहे.
बुरखा (संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख) आणि नकाब (डोळ्यांशिवाय चेहरा झाकणारा बुरखा) या दोन्ही इस्लामिक पोशाखांवर बंदी घालण्याचा स्पष्ट उद्देश या विधेयकात आहे. सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर पूर्णपणे बंदी घालणारा फ्रान्स हा २०११ मध्ये पहिला युरोपीय देश बनला होता. जगभरातील २० हून अधिक देशांनी बुरखा आणि इतर पूर्ण चेहरा झाकणा-या कपड्यांवर काही प्रमाणात बंदी घातली आहे. यामध्ये ऑस्ट्रिया, ट्युनिशिया, तुर्की, श्रीलंका आणि स्वित्झर्लंड यांसारख्या देशांचा समावेश आहे.
मेलोनी सरकारने या बंदीचे उल्लंघन करणा-यांसाठी कठोर दंडाची तरतूद केली आहे. हे विधेयक केवळ चेहरा झाकणा-या कपड्यांपुरते मर्यादित नाही, तर ते धार्मिक संस्था आणि काही विशिष्ट प्रथांवरही कठोर उपाययोजना करत आहे. इटलीमध्ये इस्लामला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही (इतर १३ धर्मांना आहे). त्यामुळे, या विधेयकानुसार मुस्लिम संघटनांना त्यांचे निधीचे स्रोत सार्वजनिकपणे उघड करण्याचे आणि ‘संशयास्पद वित्तपुरवठादारांपासून’ स्वत:ला दूर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

