मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनछगन भुजबळ यांना संधी दिली जाण्याची चर्चा होती. पण, भुजबळांनी अट घातली आणि पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली. पक्षाच्या या निर्णयानंतर छगन भुजबळ यांच्या मनातील खदखद बाहेर आली. त्यांनी पक्षातील इतर नेत्यांचा उल्लेख न करता, त्यांच्याप्रमाणेच मलाही न्याय हवा अशी शब्दात सुनावले.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘तुमच्यावर अन्याय झाला आहे का?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल, कल नही तो परसो, असे आमचे धोरण आहे. मै कबड्डी का खिलाडी हूं, शतरंज का खिलाडी नही हूं’, अशा शब्दात त्यांनी मनातील घुसमट बोलून दाखवली.
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी तुम्हाला का दिली नाही? या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, भाजपाकडे माझा प्रस्ताव मांडल्यानंतर निर्णय घेण्यासाठी शेवटचा दिवसच उरला होता. (समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद आणि स्वत:ला राज्यसभा असा प्रस्ताव होता) त्यावर भाजपाकडून उत्तर आले की, राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा समीर भुजबळ यांचा विचार करू. त्यामुळे माझा प्रस्ताव नाकारला, यामध्ये तथ्ये नाही. मी नाराजही नाही. काय नाराज व्हायचे? , असे भुजबळांनी सांगितले.
भुजबळ याच मुद्द्यावर पुढे म्हणाले की, इतरांना जोन न्याय मिळाला (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात); इतर लोक राज्यसभा-लोकसभेवर आहेत. इकडे त्यांची मुले मंत्री आहेत. मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी होती.
















