Homeअंतरराष्ट्रीयइराणच्या तेल साठ्यांवर इस्रायलचे भीषण हल्ले

इराणच्या तेल साठ्यांवर इस्रायलचे भीषण हल्ले

तेहरान : इस्रायलने इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून शनिवारी इराणच्या अनेक तेल डेपोंवर हल्ले केले. परिणाम तेहरान आणि शेजारील कारज शहर स्फोटांमुळे हादरले होते. यामुळे आकाशात आगीचे आणि धुराचे मोठे लोळ उठले होते.
सोशल मीडियावर फिरणा-या व्हीडीओंमध्ये हल्ल्याच्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात ज्वाळांचे लोळ उठताना दिसत आहेत. गेल्या आठवडाभरात अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या सर्व ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये तेहरान आणि अल्बोर्झ प्रांतातील अनेक तेल साठवणूक डेपोंना लक्ष्य करण्यात आले होते.

तेहरानच्या पश्चिमेला असलेल्या कारजमधील एका डेपोवरही हा हल्ला झाला. तेहरानचा मुख्य तेल शुद्धीकरण प्रकल्प शहर रे जिल्ह्याजवळ आहे. यावरही हल्ला करण्यात आला होता. वायव्य तेहरानमधील शहरान तेल डेपोवर गेल्या जून महिन्यात हल्ला केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला. यामुळे आगीची धग अद्यापही कमी झालेली नाही.

इराणच्या तेल मंत्रालयाने सांगितले की अग्निशमन आणि आपत्कालीन कर्मचारी आग विझविण्यासाठी काम करत आहेत. या हल्ल्यांमुळे इंधन किंवा ऊर्जेचा तुटवडा निर्माण होणार नाही, यावरही त्यांनी भर दिला. टाइम्स ऑफ इस्रायलला दिलेल्या माहितीत, इराणी तेल मंत्रालयाच्या एका सूत्राने पुष्टी केली की पश्चिम तेहरानमधील कुहक आणि शहरान भागातील तीन डेपो तसेच कारजमधील सुविधांवर इस्रायली लढाऊ विमानांनी हल्ला केला.

इस्रायली लष्कराने हल्ल्यांना दुजोरा देत म्हटलं की इंधन साठवणूक आणि ऊर्जा संकुलांचा वापर इराणच्या सशस्त्र दलांकडून केला जात होता. त्यामुळे इस्रायलकडून हा हल्ला महत्त्वाचा हल्ला म्हटले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR