22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइराणमधील २ अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचा हल्ला

इराणमधील २ अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचा हल्ला

दोन्ही केंद्रे उद्ध्वस्त, सेंट्रिफ्यूज सुविधा नष्ट, युरेनियम समृद्धीला ब्रेक
तेहरान : वृत्तसंस्था
इस्रायलने बुधवारी इराणवर शक्तिशाली हवाईहल्ले केल्याने तेहरान आणि त्याच्या आसपासच्या अणु प्रकल्पातील दोन सेंट्रिफ्यूज उत्पादन सुविधांसह प्रमुख लष्करी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे, असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने सांगितले. ६ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष इस्रायलच्या या ताज्या हल्ल्यामुळे आणखी तीव्र झाला. यामुळे प्रादेशिक युद्धाची भीती निर्माण झाली आहे.

इस्रायली लष्कराने काल रात्री इराणच्या सेंट्रिफ्यूज उत्पादन स्थळांवर आणि अनेक शस्त्रास्त्र उत्पादन स्थळांवर हल्ला केला, असे इस्रायलच्या सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे. या ऑपरेशनमध्ये ५० हून अधिक लढाऊ विमानांचा समावेश होता. गुप्तचर शाखेच्या अचूक मार्गदर्शनाखाली गेल्या काही तासांत ५० हून अधिक हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी तेहरान परिसरातील लष्करी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. इराण-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून इराणमध्ये अंदाजे ५८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आज झालेल्या हवाई हल्ल्यात किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप इराणने दिलेली नाही.

इस्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार ज्या सेंट्रिफ्यूज साईटवर हल्ला केला, त्या सेंट्रिफ्यूजमुळे इराणच्या अण्वस्त्रांसाठी युरेनियम समृद्धीकरण क्षमतेला गती मिळणार होती. इराण सरकार अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी बनवलेल्या युरेनियमचे समृद्धीकरण करीत आहे. नाजूक आणि हायस्पीड स्पिनिंग डिव्हाईसेस असलेले सेंट्रिफ्यूज युरेनियम समृद्ध करण्यासाठी वापरले जाते. या उत्पादन सुविधांना नुकसान पोहोचल्याने इराणच्या भविष्यातील युरेनियम समृद्धीकरण वाढविण्याच्या क्षमतेला मोठी बाधा पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराणने अलिकडेच १६६.६ किलो ६० टक्के समृद्ध युरेनियम तयार केले आहे. त्यामध्ये आणखी शुद्धीकरण केल्यास ते चार अणुबॉम्बसाठी पुरेसे आहे.
खोमेनींची ट्रम्पना धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्याचा सल्ला दिला होता. यावर आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी इराण लादलेली शरणागती किंवा शस्त्रसंधी स्वीकारणार नाही. त्यातच अमेरिकेने लष्करी कारवाई केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR