तेहरान : वृत्तसंस्था
इराणमध्ये सध्या सत्तेविरुद्धच्या असंतोषाचा लाव्हा उफाळून आला आहे. गेल्या काही दिवसांत तेहरानच्या रस्त्यांवरून अशी काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये इराणी महिला अत्यंत निर्भयपणे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या जळणा-या फोटोंवरून सिगारेट पेटवताना दिसत आहेत. हे केवळ एक कृत्य नसून, दशकांपासून चाललेल्या अत्याचाराविरुद्ध पुकारलेले हे एक ‘महायुद्ध’ आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या प्रतिमांमध्ये (ज्यांची अधिकृत पडताळणी अद्याप सुरू आहे) महिला केवळ सिगारेट पेटवत नाहीत, तर त्यासोबत आपले हिजाब आणि स्कार्फही जाळताना दिसत आहेत. इराणच्या कायद्यानुसार, सर्वोच्च नेत्याचा फोटो जाळणे हा राजद्रोहाचा गुन्हा असून यासाठी फाशीची शिक्षाही होऊ शकते. तरीही, मृत्यूची भीती सोडून महिलांनी अशा प्रकारे सिगारेट पेटवणे, हे तिथल्या धार्मिक राजवटीच्या अंताचे संकेत मानले जात आहेत.
इराणमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यापासून सामाजिक आणि कायदेशीररित्या प्रतिबंधित केले जाते. जेव्हा एखादी महिला खोमेनींच्या फोटोचा वापर सिगारेट पेटवण्यासाठी करते, तेव्हा ती दोन संदेश देते; पहिले म्हणजे, तिला आता पुरुषप्रधान सत्तेची भीती राहिलेली नाही आणि दुसरे म्हणजे, तिने सरकारला कच-याच्या डब्यात फेकले आहे. ही ‘प्रतिकात्मक बंडखोरी’ इराणमधील जुन्या पिढीच्या आणि नव्या पिढीच्या विचारांमधील वाढती दरी स्पष्ट करत आहे.
१९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर ज्या राजेशाहीचा अंत झाला होता, तीच राजेशाही आता पुन्हा एकदा इराणच्या जनतेसाठी ‘शेवटची आशा’ म्हणून समोर येत आहे. ट्रम्प यांनी रझा पहलवी यांना ‘एक चांगला माणूस’ म्हटले असले तरी, त्यांना थेट सत्तेवर बसवण्याबाबत अजून अधिकृत भूमिका घेतलेली नाही.
महसा अमिनी ते २०२६ चा आक्रोश
२०२२ मधील ‘महसा अमिनी’ चळवळीची आठवण ही निदर्शने करून देतात. हिजाब व्यवस्थित न घातल्यामुळे महसा अमिनीला अटक करण्यात आली होती आणि पोलीस कोठडीत तिचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून सुरू झालेली ही ठिणगी आता वणव्यासारखी पसरली आहे. डिसेंबर २०२५ च्या अखेरीस वाढत्या महागाईमुळे सुरू झालेली ही निदर्शने आता वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या मागणीसाठी उग्र रूप धारण करत आहेत. आंदोलकांनी आतापर्यंत २५ मशिदींना आग लावली, २६ बँकांमध्ये मोठी लूट केली, १० सरकारी इमारती खाक केल्या, ४८ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ४२ बस जाळून भस्मसात केल्या. लष्कराच्या कॅम्पवरही हल्ले करण्यात आले आहेत.
२७ प्रांतात भडका; २१७ बळी; सत्तापालट शक्य
इराणमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे. राजधानी तेहरानसह २७ प्रांतांमधील जनता रस्त्यावर उतरली आहे. तेहरानमध्ये ५ लाख लोक आंदोलन करीत आहेत. सरकारच्या दडपशाहीत आतापर्यंत १४ सैनिकांसह २१७ हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे २००० लोक जखमी झाले आहेत. २३०० जणांना अटक करण्यात आली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी या निदर्शनांसाठी थेट अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले असून सुरक्षा दलांना ‘दंगलखोरांना धडा शिकवा’ असे स्पष्ट आदेश दिले आहेत. दरम्यान, इराणमध्ये अमेरिका लष्करी हस्तक्षेप करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसांत इराणमध्ये सत्तापालट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

