तेहरान/वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्षाने भीषण रूप धारण केलं आहे. सहा दिवस उलटल्यानंतरही दोन्ही पैकी एकही देश संघर्ष थांबवण्याबाबत कुठलेही सकारात्मक पाऊल उचलताना दिसत नाही आहे. त्यातच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्राइलविरोधात युद्धाची घोषणा केली असून तेल अवीववर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आहे. तर इस्राइलनेही इराणची राजधानी असलेल्या तेहरानला लक्ष्य केलं आहे. या सर्व घडामोडींदरम्यान, अमेरिकेने ३० लढाऊ विमाने रवाना केली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणागती स्वीकारण्याचा सल्ला दिल्याने इस्राइल आणि इराणमधील संघर्ष आणखीनच चिघळण्याची शक्यता बळावली आहे.
इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल मीडियावर लिहिले की, Unconditional Surrender. यावरून ट्रम्प यांनी या संघर्षात इराणबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत संकेत मिळत आहेत.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना इशारा दिला आहे. इराणचे तथाकथित सर्वोच्च नेते कुठे आहेत, हे आम्हाला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यांना लक्ष्य करणं अगदी सोपं आहे. मात्र सध्यातरी ते अगदी सुरक्षित आहेत. आम्ही त्यांना किमान सध्यातरी मारणार नाही. मात्र क्षेपणास्त्रांद्वारे होणा-या हल्ल्यात नागरिकांना लक्ष्य केलं जावं, तसेच अमेरिकन सैनिकांना लक्ष्य केलं जाणं हे आम्हाला मान्य नाही. आता आमचा संयम संपत आहे.
तथापि, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशा-याला इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी केराची टोपली दाखवली आहे. तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिका-यांची इस्त्राइलने हत्या केल्यानंतरही युद्ध कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे. ´war is begin, म्हणजेच युद्ध सुरू झाले आहे असे खामेनी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
इराण झुकेगा नहीं…
‘‘इराण कोणत्याही लादलेल्या युद्धापुढे झुकणार नाही आणि लादलेला कोणताही शांतता करार स्वीकारणार नाही. तसेच अमेरिकेने कोणताही लष्करी हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, जे कधीही भरून काढता येणार नाहीत.’’
इस्रायलला माफी नाही…
‘इस्रायलने इराणी हवाई हद्दीत घुसून मोठी चूक केली आहे. ही इराणची रेड लाइन आहे आणि जो कोणी ती ओलांडेल त्याला माफ केले जाणार नाही. या चुकीची मोठी किंमत इस्रायलला मोजावी लागेल.’ त्यामुळे आता आगामी काळात इराणकडून इस्रायलवर आणखी मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे.