तेहरान : वृत्तसंस्था
इस्रायल आणि इराणमध्ये लष्करी संघर्षाचा भडका उडाला. इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन हाती घेत इराणच्या आण्विक केंद्र आणि लष्करी छावण्यांना लक्ष्य करत मिसाईल डागल्या. यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी यांच्यासह दोन अणुशास्त्रज्ञ आणि इतर काही महत्त्वाचे लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. इराणवर हल्ले केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली. इराणकडून नवीन लष्करप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्झ यांनी सांगितले की, आम्ही इराणवर हल्ले केले आहेत. इराणकडून हल्ला केला जाण्याची शक्यता असल्याने आणीबाणी लागू करण्यात आली आहे, इस्रायलने शुक्रवारी (१३ जून) इराणमधील आण्विक केंद्र आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत अंदाधुंद हल्ले केले. इस्रायलच्या मिसाईल हल्ल्यांमुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
इराणमधील सरकारी टीव्हीने अणु वैज्ञानिकांची नावे जाहीर केली आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे माजी प्रमुख फिरेदून अब्बासी आणि तेहरानमधील इस्लामिक आझाद विद्यापीठाचे अध्यक्ष (कुलगुरू) मोहम्मद मेहदी यांचा मृत्यू झाला आहे. अब्बासी यांची २०१० मध्येही हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, त्यात ते वाचले होते.