Homeलातूरईदच्या आनंदात हरित संदेशाचा सुगंध; ‘वृक्ष भेट’ उपक्रमाने जिंकली मनं!

ईदच्या आनंदात हरित संदेशाचा सुगंध; ‘वृक्ष भेट’ उपक्रमाने जिंकली मनं!

लातूर : प्रतिनिधी
ईद म्हणजे आनंद, आपुलकी आणि एकमेकांना दिल्या जाणा-या शुभेच्छांचा सण. याच आनंदाला यंदा लातूरमध्ये एक वेगळाच, हिरवागार स्पर्श लाभला. वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून मुस्लिम बांधवांना पारंपरिक भेटवस्तूंऐवजी वृक्ष भेट देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आणि या छोट्याशा उपक्रमाने मोठा संदेश दिला.
सण म्हटला की गोडधोड, नवे कपडे आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण हे चित्र नेहमीचेच. मात्र, याच परंपरेत बदल घडवत वसुंधरा प्रतिष्ठानने ‘‘भेटीतून पर्यावरणाचे रक्षण’’ हा विचार पुढे आणला. प्रत्येक वृक्षासोबत केवळ शुभेच्छाच नव्हे, तर भविष्यातील हिरवळ, स्वच्छ हवा आणि पर्यावरणाबद्दलची जबाबदारीही जोडली गेली. या प्रसंगी वाजिद भाई शेख यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. ‘‘ही भेट केवळ आजची नाही, तर उद्याच्या पिढीसाठीही मौल्यवान आहे,’’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या हरित शुभेच्छांच्या क्षणांना साक्षी राहण्यासाठी अमोल आप्पा स्वामी, डॉ.अजित चिखलीकर, प्रशांत मसलगे, गणेश वाडीकर, रजनीकांत जाधव, योगेश घोडके, शौर्य मसलगे, मिलिंद कांबळे यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता. वसुंधरा प्रतिष्ठानचा हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता, समाजात सकारात्मक विचार रुजवणारी एक सुंदर चळवळ ठरतो आहे. ईदच्या आनंदात निसर्गसंवर्धनाची बीजं रोवण्याचा हा प्रयत्न, खरंच शुभेच्छांपेक्षा अधिक काहीतरी देऊन गेला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR