31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeधाराशिवईव्हीएममध्ये १०० टक्के घोटाळा

ईव्हीएममध्ये १०० टक्के घोटाळा

बाळासाहेब थोरात आक्रमक

धाराशिव: प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा, नगरपालिका, महापालिका निवडणुकीत विरोधकांची पीछेहाट सुरू आहे. यातून पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनबाबत संशय व्यक्त होऊ लागला आहे. ‘निवडणूक आयोग हा त्यांचा (सत्ताधा-यांचा) गुलाम झाला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ईव्हीएम यंत्राचा वापर झाला पण व्हीव्हीपॅट मशिन लावली नाही. म्हणजे कोणाला मत दिले हे कळाले नाही त्यामुळे ईव्हीएम मशिनमध्ये १०० टक्के घोटाळा आहे असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधा-यांवर केला आहे.
धाराशिव इथल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानने ईव्हीएम हटवण्यासाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेत, पाठिंबा दिला आहे. याशिवाय विधानसभानंतर निवडणुकीत विरोधकांचा एकतर्फा होत असलेल्या पराभवावर चिंता व्यक्त करताना, ईव्हीएममध्ये १०० टक्के घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना थोरात म्हणाले. निवडणूक मतमोजणीला, प्रक्रियेला उशीर होतो. उशीर होत असेल तर सरळ मतपत्रिकेवर निवडणुका घ्या. ईव्हीएम कुठून आणणार तर मध्य प्रदेशातून. ज्या मध्य प्रदेशात सर्वांत मोठा ईव्हीएममध्ये घोटाळा झाला.

राज्यात नगरपालिका, महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरत आहे. धाराशिव इथल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन, ‘ईव्हीएम हटाव देश बचाओ’, अशी घोषणाबाजी केल्याने चांगलाच गोंधळ उडाला.

या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी धाराशिव येथे ईव्हीएम मशिन हटवण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची आगामी काळात धार वाढण्याची शक्यता आहे. यातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलनाकर्त्यांची भेट घेत, ईव्हीएम मशिनमध्ये नक्कीच घोटाळा आहे, असे म्हणत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

पैशाचा अमाप वापर
मोठमोठ्या देशांत निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर होतो. कारण त्यांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. तरीही सत्ताधारी सत्ता मिळविण्यासाठी ईव्हीएमचा वापर करत आहेत. निवडणूक आयोग, निवडणूक आयोग राहिलेलाच नाही, स्वत: काहीच नाही, त्यांना जे सांगितलं जातं तेच करतात, सगळी मनमानीच, हे सगळं मंत्रालयातून सांगितलं जातं, असा गंभीर आरोप थोरातांनी केला. पैशाचा वापर करायचा, धर्माचा वापर करायचा, जातीचा वापर करायचा, मतपत्रिकेत घोटाळा असल्याची टीका थोरात यांनी केली.

एमआयएम देखील परवडणार नाही
भाजपने राज्यातील राजकारणाचा चुथडा केला. लोकशाहीची मूल्ये, राज्यघटना नष्ट करण्याचे काम भाजप करत आहे. चंदिगडसारखी अनेक उदाहरणे यासाठी देता येतील. राज्यात एमआयएम पक्षाला मिळणारे यश, हे काँग्रेसचे नुकसान असले, तरी धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण चालू आहे. हे राजकारण हिंदूंना परवडणारे नाही अन् एमआयएमला देखील परवडणार नाही.

ठाकरेंच्या मुद्याला पाठिंबा
‘ईव्हीएम हटाव’च्या मुद्याला राज ठाकरे यांनी पाठिंबा देत लोकशाही वाचवायची असेल, तर हा मुद्दा कोण घेतो, कोणता पक्ष घेतो आहे, हे महत्त्वाचे नसून, मुद्दा महत्त्वाचा आहे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरेंच्या मुद्याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR