मुंबई : राज्यातील ई-स्पोर्टस् क्षेत्राला प्रोत्साहन देताना ऑनलाईन गेमिंगचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वंकष अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. सदस्य श्रीकांत भारतीय यांनी ई-स्पोर्टस् संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे क्रीडा धोरण हे प्रामुख्याने कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स यांसारख्या मातीतल्या आणि मैदानी खेळांना प्राधान्य देणारे आहे. मात्र बदलत्या काळानुसार ई-स्पोर्टस्लाही जागतिक स्तरावर मान्यता मिळत असून केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने त्याचा बहुक्रीडा स्पर्धांमध्ये समावेश केला आहे.
२०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ई-स्पोर्टस्चा अधिकृत समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत महाराष्ट्रातील पाच खेळाडूंनी सहभाग घेतला असून त्यांच्या तयारीसाठी क्रीडा विभागामार्फत प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. इतर राज्यांनी तयार केलेल्या ई-स्पोर्टस् धोरणांचा अभ्यास करण्यात येणार असून त्यातील सकारात्मक आणि मर्यादित बाबींचा विचार करून महाराष्ट्राचे धोरण निश्चित केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ई-स्पोर्टस् क्षेत्रातील खेळाडू, तज्ज्ञ आणि आशियाई स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंचे अभिप्रायही धोरण तयार करताना विचारात घेतले जातील. राज्य शासन ई-स्पोर्टस् क्षेत्राबाबत सकारात्मक असून मैदानी खेळांना प्राधान्य कायम ठेवत नव्या क्रीडा प्रकारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
















