पुणे : प्रतिनिधी
गणरायाच्या आगमनाआधीच मोदकांच्या आगाऊ नोंदणीसाठी पुणेकरांची लगबग सुरू झाली असून, यंदाही गणेशोत्सवातील दहा दिवस नैवेद्य दाखवण्यासाठी उकडीच्या मोदकांना मोठी मागणी आहे. गेल्या महिनाभरापासून आगाऊ नोंदणी सुरू असून, पहिल्या दिवसासह संपूर्ण दहा दिवसांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळत आहेत.
दर वर्षी मोदक बनणा-यांची संख्याही वाढत आहे. प्रामुख्याने हा व्यवसाय महिला – तरुणींकडून केला जात आहे. यंदा घरगुती गणपतींपासून गणेश मंडळे, केटरिंग व्यावसायिक, हॉटेल, डायनिंग हॉल, कंपन्या आणि विविध संस्थांकडून मोठ्या प्रमाणात मोदकांची मागणी होत आहे.
व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात आगाऊ नोंदणी केली जात असून, उपलब्ध मनुष्यबळ आणि उत्पादन क्षमतेनुसारच नोंदणी स्वीकारली जात आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतूनही मोदकांसाठी मागणी येत असल्याने व्यावसायिकांची तयारीची लगबग सुरू झाली आहे. यंदा प्रत्यक्ष दुकानात तसेच ऑनलाइन माध्यमातूनही मोदकांची नोंदणी होत आहे.
मोदकांच्या किमतीत ५ रुपयांची वाढ
यंदा उकडीच्या मोदकासाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. मागील वर्षी हाच मोदक ३० रुपयांना मिळत होता. मोदकासाठी लागणारा गूळ, साखर, तांदूळ आणि नारळाच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच मजुरी आणि गॅसच्या खर्चातही वाढ झाल्याने मोदकांच्या किमती वाढल्या आहेत.
















