मुंबई : गोरेगाव पूर्व भागातील राम मंदिर परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे दोघांना स्वत:चे प्राण गमवावे लागले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, शौचालयातील केमिकलच्या उग्र वासामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही भयानक घटना पारसी पंचायत गेटसमोर, मृणालताई ब्रिजजवळ घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता सार्वजनिक शौचालयात केमिकलच्या वासाने दोघांना श्वास गुदमरल्याची माहिती मिळाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. दोघांना तात्काळ बेशुद्ध अवस्थेत ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शौचालयात येत असलेल्या उग्र वासामुळे ज्या दोघांनी आपले प्राण गमावले त्यांची नावे देखील समोर आली आहे. मृतांची ओळख प्रभाकर धनिवार (२४ वर्षे)आणि भावीन देसाई (१८ वर्षे) अशी झाली आहे. प्राथमिक तपासानंतर दम लागून मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.
समोर येत असलेल्या माहितीनुसार, या शौचालयाच्या बाजूला घरगुती छोटा कारखाना आहे, त्यामध्ये काही केमिकल वापरले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यातील लोक केमिकल ड्रेनेजमध्ये टाकतात आणि ड्रेनेज लाईन व संडासची लाईन बाजू-बाजूला आहे, हे केमिकल घातक आहे. सध्या बॉडीचे ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम सुरू आहे, कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल.
















