लातूर : प्रतिनिधी
उघड्यावर कचरा जाळणे, पेटवून देणे, कायद्यानूसार गुन्हा असला तरी लातूर शहरात नागरीक, व्यापारी बिनधिक्कतपणे उघड्यावर कचरा जाळत आहेत. रात्री ११ वाजल्यानंतर उघड्यावर कचरा जाळला जात आहे. रात्रभर कचरा जळून धुराचे लोळ उठत आहेत. कचरा जाळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे हवेचे प्रदुषणही वाढत आहे. रात्री कचरा जाळला जात असल्यामुळे संबंधीत यंत्रणा झोपीत आणि शहर धुराच्या लोळात, अशी परिस्थिती आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील घनकच-याचे व्यवस्थापन केलेले आहे. जनाधार सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरात दररोज घंटागाडीद्वारे कच-याचे संकलन करण्यात येते. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करुन संकलित केला जातो. ओला आणि सुका असे दोन्ही मिळून साडेतीनशे टन कचरा संकलित केला जातो. असे असले तरी उघड्यावर कचरा जाळण्याच्या घटना दररोजच तेही रात्री घडत आहेत. शहरात खाजगी आस्थापना मोठ्या प्रमाणात आहेत. या आस्थापनांपर्यंत घंटागाडी पोहंचत नाही. त्यामुळे खाजगी आस्थापनांच्या मालकांकडून कचरा जाळण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडत आहेत.
उघड्यावर कचरा जाळण्याच्या घटना रोखण्याकरीता लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने काही उपाययोजना केलेल्या आहेत. स्वच्छता विभागाचे एक पथक नेमण्यात आलेले आहे. हे पथक उघड्यावर कचरा जाळणा-यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे. यात प्रमुख अडचण अशी की, दिवसा कचरा जाळणा-यांवर हे पथक कारवाई करले. संबंधीतांवर फौजदारी गुन्हा दाखल होईल. परंतू, रात्री अपरात्री उघड्यावर कचरा जाळणा-यांवर स्वच्छता विभागाचे पथक नजर ठेवणार कशी? हा खरा प्रश्न आहे. रात्री अपरात्री उघड्यावर कचरा जाळणा-यांवर कारवाई करण्याकरीता या पथकाला रात्रीची गस्त घालावी लागेल, अशी सध्यातरी परिस्थिती दिसून येत आहे.