26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeराष्ट्रीयउच्च शिक्षणाबाबत एकच नियामक मंडळ स्थापणार

उच्च शिक्षणाबाबत एकच नियामक मंडळ स्थापणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील उच्चशिक्षण विषयक एकच नियामक मंडळ स्थापन करण्यासंदर्भातील ‘विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक’ १३ जणांच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या संदर्भातील प्रस्ताव लोकसभेत मांडला. त्याला आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली. ही समिती या संदर्भातील आपला अहवाल पुढील वर्षी अर्थसंकल्पाच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या दिवशी सरकारला सादर करणार आहे.

या विधेयकामुळे होणारे बदल….
१. यूजीसी, एआयसीटीई, एनसीटीई, पीसीआय बरखास्त केले जातील. पण नॅशनल मेडिकल कौन्सिल अंतर्गत येणारे वैद्यकीय शिक्षण आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत येणारे कायद्याचे शिक्षण यात बदल केला जाणार नाही. इतर सर्व उच्चशिक्षण एकाच छत्राखाली येईल.

२. नव्या विधेयकानुसार एकच राष्ट्रीय अध्यक्ष असेल. त्याच्या अधीन नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी कौन्सिल, नॅशनल अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल, हायर एज्युकेशन ग्रॅट्स कौन्सिल, जनरल एज्युकेशन कौन्सिल अशा चार परिषद असतील. प्रत्येकाचा स्वतंत्र प्रमुख असेल. तसेच नियमन, मानांकन, निधी आणि अभ्यासक्रम हे सर्व आता एकमेकांपासून वेगळे असतील.

३. इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, बिझनेस मॅनेजमेंट-बिझनेस स्कूल, हॉटेल मॅनेजमेंट व इतर व्यावसायिक अभ्यासक्रम यांचे मानांकन सुरूच राहील.

मूल्यांकन तंत्रज्ञानावर अवलंबून : कागदपत्रे, भेटी आणि व्यक्तिनिष्ठ निर्णयांवर अवलंबून असलेले मूल्यांकन आता तंत्रज्ञानावर अवलंबून राहील. मानांकन पूर्णत: डिजिटल असेल प्रत्यक्ष तपासण्या होणार नाहीत. डेटा व डॅश बोर्डवर आधारित मूल्यांकन होईल. याने पारदर्शकता वाढेल, मनमानी होणार नाही, व्यवस्था अधिक लोकोपयोगी बनेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR