औसा : प्रतिनिधी
सहकारमहर्षी तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंकल्प फाऊंडेशनच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उजनी येथे ७६ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षचळवळीस नव्याने बळ देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते झाले. यावेळी कॉंंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जि.प. माजी उपाध्यक्ष नारायणराव लोखंडे, बाजार समितीचे संचालक प्रवीण कोपरकर, धनराज बरदापूरे, गौतम दरेकर, डॉ. देवणीकर, डॉ. कदम, बंडप्पा धासले, अमोल ढवण, तुकाराम ढवण, शिवाजी मुकडे, बशीर शेख, मन्सूर रुईकर, चंद्रकांत ढवण, धनंजय मुकडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
सहकारमहर्षी तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून प्रथम कारभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात वृक्षचळवळ अधिक व्यापक करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. शहरातील मुख्य रस्त्यांवर आजही दिसणारी हिरवळ ही त्यांच्या दूरदृष्टी, नियोजन आणि पर्यावरणप्रेमाची जिवंत साक्ष मानली जाते. धरती मॉं की यही पुकार, बच्चे कम हो पेड हजार’ हा त्याकाळात दिलेला संदेश जनमानसात विशेष गाजला होता. विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणारा हा विचार आजही प्रेरणादायी ठरत आहे. त्याच परंपरेला पुढे नेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा पुन्हा वृक्षचळवळीचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच वृक्ष लागवड ही केवळ औपचारिकता नसून पुढील पिढ्यांसाठी हिरवे भविष्य निर्माण करण्याची जबाबदारी असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
















