डिनर डिप्लोमसी, खासदार, आमदारांची बोलावली होती बैठक
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम माटुंग्याच्या ष्णमुखानंद सभागृहात काल पार पडला. या कार्यक्रमात आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केला. त्यानंतर आज त्यांनी पक्षाचे खासदार, विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरवण्याबाबत उद्धव ठाकरेंनी सूचना केल्या. त्यामुळे ठाकरे आता आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचे चित्र आहे.
उद्धव ठाकरे यांनी खासदारांसह विधानसभा आणि विधान परिषद आमदारांची मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेतली. उद्धव ठाकरेंकडून आमदारांना स्रेह भोजनाचे निमंत्रण देण्यात आले होते. आगामी महापालिका निवडणुका आणि पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा, विधान परिषद आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात शिवसेना आमदारांनी काय करावे, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. येणा-या पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न सभागृहात मांडा, स्थानिक पातळीवरील प्रश्न हे अधिवेशनात आमदारांनी मांडले पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. स्थानिक पातळीवरच राजकारण बघून आणि त्या त्या ठिकाणची राजकीय स्थिती बघून युती आघाडीचा निर्णय पक्ष म्हणून घेऊ, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाची रणनीती कशी असेल, याचे संकेत दिले.
उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख नेत्यांची बैठकदेखील आज दुपारी घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना मतदार याद्यांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदार कसे वाढले, कुठे वाढले, बोगस मतदार शोधा, गटप्रमुखांनी ४० लाख मतदार कसे वाढले हे तपासावे, मतदार याद्यांच्या घोळाबाबत माहिती समोर आणा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या.
तीन चार महिने
पक्षाकडे लक्ष द्या
पुढचे तीन-चार महिने पक्षाकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या. महापालिका निवडणुकीत अधिकाधिक आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, ज्या ठिकाणी आपला आमदार, खासदार नाही, त्या ठिकाणीसुद्धा स्थानिक नेत्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आमदारांना केल्या.