मुंंबई : प्रतिनिधी
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातही उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी भाजपने जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज एकत्र आले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. त्यात फक्त तीन शब्दांत आपले नेमके म्हणणे मांडले आहे. ‘उद्या २४ डिसेंबर दुपारी १२ वाजता’ असे वाक्य लिहून त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. त्यात ठाकरे बंधूंच्या हातांमध्ये गुलाबाच्या फुलांचा एक मोठा गुच्छ दिसतोय. एखाद्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राऊत यांचे ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजप नेते राम कदम म्हणाले की, राज ठाकरे यांनी पक्ष सोडला नव्हता. त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडायला भाग पाडले होते. मात्र, आता त्यांना राज यांची आवश्यकता आहे. त्यामुळे ते त्यांच्या दारी गेले आहेत. कोविडच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. जनतेच्या कफनमध्ये पैसे खाल्ले. आता दोघेही मराठी माणसांवर बोलतील. मात्र, यांना आवश्यकता असेल, तेव्हा मराठी माणूस आठवतो. हे किती एकत्र येऊ द्या. त्यांचा आकडा ३५-४० च्या वर जाणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

