नागपूर : प्रतिनिधी
जर चेतक घोड्याची आई गुजराती असू शकते, तर हापूस आंबा का असू शकत नाही? उद्या मुंबईही गुजरातची झालेली दिसेल! अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सत्ताधा-यांवर ‘इतिहास बदलण्याचा प्रयत्न’ केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
हापूसवरील हा कृषी-आर्थिक वाद आता स्पष्ट राजकीय रंगात परिवर्तित झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आरोप केला आहे की केंद्र सरकार महाराष्ट्राची उपेक्षा करीत असून अनेक प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातकडे वळवले गेले आहेत. आता हापूस आंबाही गुजरातकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा थेट आरोप पक्षाने केला आहे.
दरम्यान, गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील ‘भारतीय किसान संघटना’ (बीकेएस) यांनी त्यांच्या स्थानिक हापूस आंब्याला भौगोलिक संकेत टॅग मिळवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी अर्ज केला असून, त्याची पहिली सुनावणी ३० ऑक्टोबरला पार पडली आहे. पुढील सुनावण्यांनंतर अंतिम निर्णय होणार आहे. वलसाड हापूसचा स्वतंत्र जीआय टॅग मिळावा, यावर ते सातत्याने आग्रही आहेत.
तथापि, कोकणातील शेतकरी आणि उत्पादक संघटना या प्रस्तावाला कडाडून विरोध करत आहेत. कोकण हापूस-म्हणजेच अल्फोन्सो- हा रत्नागिरी, देवगड आणि सिंधुदुर्गच्या कृषि परंपरेचा, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रतिष्ठेचा अविभाज्य भाग मानला जातो. कोकण उत्पादक संघटनेचे अध्यक्ष विवेक भिडे यांनी स्पष्ट इशारा दिला की, वलसाडला जीआय मिळाल्यास कोकणी हापूसची जागतिक ओळख आणि त्याची ब्रँड व्हॅल्यू कमी होऊ शकते.
भिडे यांच्या मते, कोकणचा हापूस तंतूमुक्त, मलाईदार, गोड आणि विशिष्ट सुगंधामुळे जगभर वेगळ्या ओळखीने प्रसिद्ध आहे. दोन समान फळांना स्वतंत्र जीआय दिल्यास ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण होईल आणि बाजारपेठेत कोकणी उत्पादनाची किंमत कमी होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

