लातूर : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या अटकेत असलेला प्रा. शिवराज मोटेगावकरच्या अनधिकृत संपत्तीची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. उद्योगासाठी राखीव असणा-या उद्योग भवन परिसरात मोटेगावकरचे एकुण ९ प्लॉट आहेत. त्यातल्या एका प्लॉटवर तर गेल्या अनेक दिवसांपासून टोलेजंग इमारतीचे काम देखील सुरु आहे, मात्र उद्योगासाठी राखीव असलेल्या जागेवर ट्युशन क्लासेस आणि इतर व्यवसाय करता येत नाहीत, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून लातुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी माहितीच्या अधिकारात लढा सुरु ठेवला आहे. मात्र प्रशासन यावर गंभीर नसल्याचा आरोप करत ही सर्व बांधकामे अवैद्य असून ते पाडण्यात यावेत व वेटिंगमध्ये असलेल्या उद्योजकांना जागा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रा. शिवराज मोटेगावकर याच्या बेहिशोबी आणि अनाधिकृत संपत्तीवर आता ईडीची नजर असून ईटीकडून हालचालीना वेग आला आहे. नांदेड येथे धडकलेलं ईडीचं पथक लातुरात कोणत्याही क्षणी दाखल होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लातुरात देखील शिवराज मोटेगावकर याची बेहिशोबी संपत्ती असून लातूरच्या चारही बाजूने जमिनी खरेदी करण्याचा धडाकाच शिवराज मोटेगावकरने सूरू केला
होता.
खोपेगाव शिवारात तर कोट्यावधिच्या टोलेजंग इमारतीचं अनधिकृत बांधकाम सुरु असून प्रा. शिवराज मोटेगावकरचा हा ड्रिम प्रोजेक्ट मानला जात आहे. नीट पेपर फुटीप्रकरणात प्रा. मोटेगावकर मुख्य सुत्रधार असल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाल्यानंतर सीबीआयकडून प्रा. मोटेगावकरशी संबंधीत सर्वच बारीकसारीक गोष्टींचा कसुन तपास केला जात आहे. प्रा. मोटेगावकर याने कोणाकोणाला नीटचा पेपर दिला, या प्रकरणात कोणाकोणाचा संबंध आहे, या सर्व बाबी तपासल्या जात आहे. त्यामुळे येत्या काळात मोटेगावकर याने केलेला कारनामा हळूहळू समोर येत आहे.
जागाच नावावर नाही, बांधकाम परवाना मात्र दिला
लातूरपासून जवळच असलेल्या खोपेगाव येथे प्रा. शिवराज मोटेगावकरच्या संस्थेच्या इमारतीचे टोलेजंग बांधकाम सुरु आहे. बांधकाम ज्या जागेवर होत आहेत ती जागा अद्यापही प्रा. मोटेगावकरच्या नावावर नाही. असे असताना लातूर शहर महानगरपालिकेने मात्र बांधकाम परवाना मोटेगावकरच्या नावाने दिलेला आहे. ही इमारत खोपेगावच्या शिवारात येते. खोपेगाव ग्रामपंचायतीनेही प्रा. मोटेगावकरला बांधकाम परवाना दिलेला नसल्याची बाब पूढे आली आहे.
















