Homeमहाराष्ट्रउन्हाच्या झळांमुळे विजेची मागणी वाढली

उन्हाच्या झळांमुळे विजेची मागणी वाढली

कूलर, पंखे, फ्रीज यांचा वापर वाढला

पुणे : प्रतिनिधी
राज्यात ऐन मार्च महिन्यातच उन्हाचा चटका वाढला आहे. विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत सुमारे २४ ते २५ हजार मेगावॅटच्या आसपास विजेची मागणी होती. ती आता २६ हजार ९४७ मेगावॅटवर पोचली आहे. पुण्यातही मागणी वाढणार असून ती ५ हजार मेगावॅट होण्याचा अंदाज आहे.

राज्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, तसेच कोकणच्या काही भागांत हा तडाखा वाढला आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ४० अंशांवर पोचला आहे. त्यामुळे वातानुकूलित यंत्राचा वापर घरासह व्यावसायिक, औद्योगिक ठिकाणी वाढला आहे. त्यामुळे अचानक राज्यात मागील काही दिवसांपासून विजेची मागणी वाढली आहे. वाढत्या विजेच्या मागणीमुळे त्याची पूर्तता करण्यासाठी वीज कंपन्यादेखील सरसावल्या आहेत. त्यामुळे २६ ते २७ हजार मेगावॅट एवढी वीज पुरवठा करणे शक्य होऊ लागले आहे. उन्हाच्या झळा वाढल्यानंतर ही मागणी अजून वाढत जाणार आहे, असे महावितरणच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.

जानेवारीत आतापर्यंतची सर्वाधिक मागणी
राज्यात विजेची मागणी मागील आठवड्यात २५ हजार ७७१ मेगावॅट होती. त्यानंतर ती २५ हजार ४५८ मेगावॅटवर पोहोचली. या वर्षातील आतापर्यंतची सर्वाधिक वीज मागणी १४ जानेवारी रोजी २७ हजार १८७ मेगावॅट इतकी होती.

पुण्यातही मागणी वाढणार
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून आखातातही युद्धाचा भडका उडाला आहे. या स्थितीमुळे गॅसटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांचा इलेक्ट्रिक शेगड्या खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे. त्यामुळे शहरातील विजेची मागणी वाढत जाण्याची शक्यता आहे.

गॅस टंचाईमुळे विजेची मागणी वाढणार
या गॅस शेगड्यांमुळे शहर परिसरात विजेची मागणी वाढण्याची शक्यता जास्त आहे. सध्या पुणे परिमंडलात कमाल ४ हजार ६०० मेगावॅट विजेची मागणी आहे. मात्र, उन्हाळा आणि गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही मागणी ५ ते १० टक्के अर्थात ३०० ते ४०० मेगावॅटने वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती महावितरणच्या पुणे परिमंडलातील अधिका-यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR