पंढरपूर : आषाढी यात्रा कालवधीत येणाऱ्या लाखो भाविकांना आरोग्याबाबत सोयी-सुविधा पुरवणाऱ्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेची व व्यवस्थित नसलेल्या कामकाजाची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशाने तपासणी केली. डॉ. महेशकुमार सुडके यांच्यावर कारवाई करत त्यांना तत्काळ पदमुक्त करून उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचा पदभार डॉ. दीपक धोत्रे यांच्याकडे देण्यात आला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये रुग्णालयातील स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच आ. आवताडे व आ. राजू खरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आरोग्य विभागाच्या यात्रा आढावा बैठकीत पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयीन अस्वच्छतेबाबत व कामकाजबाबत तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी एका पथकाद्वारे उपजिल्हा रुग्णालयाच्या तपासणीचे आदेश दिले होते.
रुग्णालयातील आंतररुग्ण कक्षातील टॉयलेट तुंबलेले आढळून आले. तसेच तेथे पाण्याची सोय नव्हती. काही टॉयलेट हे बंद अवस्थेत आढळून आले. तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे पोस्टर (आयईसी) हे जुने आढळून आले आहे.रुग्णालयाच्या विभागातील साहित्यांची मांडणी अस्ताव्यस्त स्वरूपात आढळून आली आहे. तसेच रुग्णालयामध्ये बायोमेडिकल कचरा हे व्हरांड्यामध्ये टाकण्यात आले होते. यामुळे रुग्णांना नाहक त्रास होत आहे.असे मुद्दे तपासणीत दीसून आले.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशाने राज्याचे आरोग्य संचालक विजय कंदेवाड व अतिरिक्त संचालक डॉ. सांगळे व आरोग्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अंबादास देवमाने यांची समिती तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे भेट देईल व तेथील परिस्थितीबाबत पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला.