23.7 C
Latur
Friday, July 11, 2025
HomeUncategorized‘एअर इंडिया’च्या अपघाताचा ‘टाटा’ समूहाला मोठा धक्का!

‘एअर इंडिया’च्या अपघाताचा ‘टाटा’ समूहाला मोठा धक्का!

शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण; सर्व कंपन्यांच्या शेअर्सवर प्रचंड दबाव; सेन्सेक्स, निफ्टीने नफा गमावला

मुंबई : वृत्तसंस्था
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला. २४२ प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी परिसरात ७०० फूट उंचीवरून कोसळले. या अपघाताच्या बातमीने शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली. टाटा ग्रुपच्या मालकीची असलेल्या एअर इंडिया या विमान कंपनीशी संबंधित या घटनेमुळे, टाटा समूहाचे सर्व शेअर्स एकामागून एक कोसळले. यामुळे केवळ विमान वाहतूक क्षेत्रालाच नाही, तर संपूर्ण टाटा समूहाच्या शेअर बाजारातील प्रतिमेलाही मोठा धक्का बसला आहे.

या अपघाताची बातमी येताच, टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स प्रचंड घसरले. टाटा स्टील आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये ३% पेक्षा जास्त घसरण दिसून आली असून टाटा केमिकल्स ३% ने घसरले. तसेच टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स जवळपास ४% ने कोसळले. टीसीएस (ळउर), टाटा पॉवर, टाटा एलेक्ससी, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा कंज्यूमर, टाटा स्टील, इंडियन हॉटेल यांसारख्या इतर प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्येही २.५% पर्यंत घसरण दिसून आली.

तज्ज्ञांच्या मते, अशा घटनांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण होतो, ज्यामुळे संबंधित समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव येतो. एअर इंडिया आणि टाटाचे नाव जोडले गेल्याने, बाजार आता संपूर्ण समूहाला एकाच नजरेने पाहू लागला आहे.

शेअर बाजारातही मोठी घसरण : आज (गुरूवारी) भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सुरुवातीचा त्यांचा नफा गमावला आणि ते लाल रंगात (घसरणीसह) आले. दुपारी २.१५ च्या सुमारास सेन्सेक्स जवळपास १,००० अंकांनी घसरून ८१,५३१.९३ वर व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टी ३०१ अंकांनी घसरून २४,८४०.२५ वर पोहोचला. निफ्टीवर इन्फोसिस, इटरनल, टेक महिंद्रा आणि टाटा मोटर्स यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली.

कुंजकेतू योग विनाशकारी : व्यास
डॉक्टर अनीष व्यास यांनी कुंजकेतू योगाविषयी ज्योतिषशास्त्राआधारे काही माहिती दिली. त्यानुसार, ७ जून रोजी मंगळ हा सिंह राशीत दाखल झाला. तर तिथे केतू अगोदरच ठाण मांडून बसला आहे. या दोन ग्रहांची जेव्हा युती होते, तेव्हा ती अशुभ मानण्यात येते. मंगळ हा अग्नि तत्त्वाचा तर केतू हा छाया देणारा ग्रह मानण्यात येतो. दोघांची युती ही विनाशकारी मानण्यात येते. सध्या भारताच्या कुंडलीत चौथ्या घरात मंगळ आणि केतू दाखल होतील. त्यामुळे एक नाही तर तीन तीन अग्नि तत्व यावेळी भारताच्या कुंडलीत आले आहेत. देशात अनेक स्फोटक, महाविनाशक अशा चिंता वाढवणा-या घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR