परदेशी वारी धोक्यात, युद्ध, जेट इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पश्चिम आशियातील संघर्ष, जेट इंधनाच्या वाढत्या किमती आणि प्रमुख क्षेत्रांमधील एअर स्पेसवरील निर्बंध यामुळे मेटाकुटीला आलेल्या एअर इंडिया कंपनीने बुधवारी जून ते ऑगस्ट या कालावधीत २९ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानांच्या फे-या स्थगित किंवा कमी करण्याची घोषणा केली. यामुळे परदेशवारी करणा-यांना मोठा धक्का बसला आहे.
एअर इंडियाने दिलेल्या अधिकृत निवेदनात काही विशिष्ट प्रदेशांवरील एअर स्पेसवर असणारे निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीच्या जेट इंधनाच्या विक्रमी दरवाढीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. काही मार्गावरील सेवा तात्पुरत्या स्वरुपात स्थगितही केल्या जाणार आहेत. जून ते ऑगस्ट या कालावधीत ही कपात केली जाणार असून या कपातीनंतरही पाच खंडांमध्ये दर महिन्याला १२०० हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
विविध आव्हाने असतानाही एअर इंडिया दर महिन्याला १२०० हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू ठेवणार आहे. उत्तर अमेरिकेसाठी दर आठवड्याला ३३ फे-या, युरोपसाठी दर आठवड्याला ४७ फे-या, यूकेसाठी दर आठलड्याला ५७ फे-या, ऑस्ट्रेलियासाठी दर आठवड्याला ८ फे-या, पूर्व आशिया, आग्नेय आशिया आणि सार्क प्रदेशांसाठी दर आठवड्याला १५८ उड्डाणे आणि आफ्रिकेतील मॉरिशससाठी दर आठवड्याला ७ फे-या सुरू राहतील, असे सांगण्यात आले.
मे महिन्यात १०० फे-या रद्द
दिल्ली-शिकागो, मुंबई-न्यूयॉर्क, दिल्ली-शांघाय, चेन्नई-सिंगापूर आणि इतर दोन मार्गांवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करणार आहे. दरम्यान, एअर इंडियाने मे महिन्यात आधीच जवळपास १०० फे-या कमी केलेल्या आहेत, असेही सांगितले.
















