मुंबई : प्रतिनिधी
भारतातील मध्यमवर्गीय रोजगाराला मोठा फटका बसू शकतो, असा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय आर्थिक तज्ज्ञांनी दिला आहे. देशातील रोजगार बाजारात सध्या ज्या प्रकारचे बदल होत आहेत, त्यातून सुमारे २ कोटी नोक-या पुढील काही वर्षांत गमावल्या जाऊ शकतात, असे विश्लेषकांचे मत आहे. हा धक्का आर्थिक मंदीमुळे नव्हे तर जागतिक व्यापारातील अस्थिरता, एआय तंत्रज्ञानाचा वेगाने वाढणारा वापर आणि कंपन्यांनी खर्च कपातीसाठी केलेल्या मोठ्या बदलांमुळे येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मारसेल्स इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक आणि वरिष्ठ अर्थतज्ज्ञ सौरभ मुखर्जी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतून यासंबंधी इशारा दिला. भारताने अमेरिकेच्या बदलत्या व्यापार धोरणांशी योग्य पद्धतीने जुळवून घेतले नाही तर आयटी, बँकिंग, मीडिया, ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रांत व्यापक प्रमाणात व्हाईट-कॉलर जॉब कट्स दिसू शकतात. तज्ज्ञांच्या मते, एआय आणि जनरेटिव्ह टेक्नॉलॉजीजच्या वापरामुळे कंपन्यांना कमी कर्मचा-यांमध्ये अधिक काम करता येते. विशेषत: एआय आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्रात हजारो नोक-या कंत्राटी किंवा प्रोजेक्ट-आधारित भूमिकांमध्ये बदलत आहेत.
भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांनी मागील एक वर्षात नवीन भरतींना ब्रेक, कर्मचा-यांचे पुनर्संरचना कार्यक्रम आणि काही विभागांचे ऑटोमेशन आक्रमक पद्धतीने सुरू केले आहेत. त्यामुळे पारंपरिक, स्थिर वेतनभोगी नोक-यांचा पाया कमकुवत होत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांवर गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जांचे प्रमाण गेल्या ५ वर्षांत प्रचंड वाढले आहे. नोकरी गमावण्याची भीती वाढल्याने या कर्जांचा भार मध्यमवर्गीयांवर अधिकच ताण निर्माण करत आहे. तज्ज्ञांच्या मते भारतात नोकरीची अनिश्चितता+वाढते कर्ज+महागाई यामुळे मिडल क्लास आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक अस्थिर स्थितीत आला आहे.
अमेरिकेने काही आयातीत वस्तूंवर धोरणात्मक टॅरिफ वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्याचा थेट परिणाम भारतातील उत्पादन, एआय-सेवा निर्यात आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर होऊ शकतो. अमेरिकन व्यापार धोरण स्थिर नसेल, तर भारतातील लाखो नोक-या धोक्यात येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी सरकार, उद्योग क्षेत्र आणि कौशल्य-विकास व्यवस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांची नितांत गरज आहे. अन्यथा २ कोटी नोक-या धोक्यात येण्याचा इशारा वास्तवात बदलू शकतो आणि त्याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गालाच बसेल. त्यामुळे भारत सरकारनेदेखील या दृष्टीने पावले उचलणे गरजचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
तंत्रज्ञानाशी जुळवून
घेणे हाच सुरक्षित मार्ग
तज्ज्ञांनी रोजगार क्षेत्रातील हा बदल जलद गतीने चालू राहील. एआयमुळे पुढील २-३ वर्षांत भारतात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. त्याचा थेट फटका मध्यमवर्गीयांना बसणार आहे. दरम्यान, कौशल्यवृद्धी, एआय आधारित नवीन क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे हेच पुढील काळातील सुरक्षिततेचे मार्ग आहेत.

