मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेले १७ दिवस अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत आहेत. सोमवारी (१५ सप्टेंबर) उपोषणाच्या अठराव्या दिवशी ते समर्थकांसह मुंबईकडे कूच करणार होते. मात्र, मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे दोनदा अर्ज केले. पण, दोनही वेळा त्यांचा अर्ज पोलिसांकडून नाकारण्यात आला. अशामध्ये सोमवारी मनोज जरांगेंच्या वतीने तिस-यांदा अर्ज दाखल करण्यात आला असून ५० लोकांना आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यांनी अर्जात केल्याचे कळते. त्यामुळे आतातरी मुंबई पोलिस त्यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येणार की नाही? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.
मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवाचे आणि कायदा सुव्यवस्थेचे कारण देत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला दोनदा परवानगी नाकारली आहे. आता मुंबईतील काही वकील बांधवांनी जरांगे आणि त्यांच्या ४ ते ५ सहका-यांना तरी आंदोलनाची परवानगी मिळावी, यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे नव्याने तिसरा अर्ज दाखल केला आहे. यावेळेस तरी परवानगी मिळेल, अशी अपेक्षा मराठा आंदोलकांना आहे. ‘मी एकटाच मुंबईला जाणार, तुम्ही येऊ नका,’ असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समर्थकांना केले आहे. त्यामुळे, काहीही झाले तरीही मनोज जरांगे हे मुंबईत आंदोलनावर ठाम आहेत.
पोलिसांनी दुस-यांदा परवानगी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या जरांगे पाटील यांनी रविवारी (१४ सप्टेंबर) रात्रीपासून वैद्यकीय उपचार आणि सलाईन घेणे पूर्णपणे थांबवले आहे. सोमवारी (१५ सप्टेंबर) सकाळी पुन्हा वैद्यकीय पथक त्यांची तपासणी करण्यासाठी आले होते, पण त्यांनी उपचारास स्पष्ट नकार दिला. यामुळे त्यांना मोठा अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असल्याचे उपस्थितांचे म्हणणे आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने मराठा आंदोलकांनी आता एक नवा आणि लक्षवेधी पवित्रा घेतला आहे. आम्ही आमच्या सोयीनुसार मुंबईत गणपती पाहायला जाणार आहोत, आम्हाला गणेशोत्सव पाहण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जेव्हा जरांगे पाटील बोलावतील, तेव्हा आम्ही सर्वजण आझाद मैदानात जमा होऊ, असे समर्थकांचे म्हणणे आहे.
















