लातूर : प्रतिनिधी
विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन कुटुंबांना आणि दोन मनांना जोडणारा संस्कार आहे. मात्र, बदलत्या काळात योग्य जीवनसाथी शोधताना युवक-युवतींसह पालकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच अडचण लक्षात घेऊन ऑल इंडिया भावसार महासभा व भावसार क्षत्रिय समाज, लातूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय वधू-वर व पालक परिचय मेळाव्याला महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १३०० वधू-वरांनी या मेळाव्यात सहभागी होत एकमेकांशी परिचय करून घेतला. त्यामुळे हा मेळावा केवळ परिचयाचा नव्हे, तर अनेक नव्या नात्यांना दिशा देणारा भावनिक सोहळा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. उपस्थित वधू-वर व पालकांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. मेळाव्यात सहभागी झालेल्या वधू-वरांनी व्यासपीठावर येऊन स्वत:चा परिचय करून दिला. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कुटुंबीय पार्श्वभूमी तसेच भावी जीवनसाथीबाबतच्या अपेक्षा त्यांनी स्पष्टपणे मांडल्या. युवक-युवतींच्या या परिचयामुळे पालकांनाही आपल्या मुला-मुलीसाठी योग्य स्थळ निवडण्यास मदत झाली. नोकरी करणा-या युवक-युवतींसोबतच व्यापारी, उद्योजक आणि विविध व्यवसाय करणा-या युवक-युवतींनाही समान संधी मिळावी, यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.
मेळाव्यातील सर्वाधिक भावनिक क्षण म्हणजे यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून परिचय होऊन विवाहबद्ध झालेल्या तीन जोडप्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. समाजाच्या वतीने या तीनही जोडप्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची भेट देण्यात आली. गिरीश वायचळ, रमेश नवले यांनी मनोगत व्यक्त केले. हणमंतराव बोंबले यांचा गौरव करण्यात आला. डॉ. दामोदर पतंगे यांच्या कार्याची माहिती व्हिजनच्या माध्यमातून उपस्थितांना देण्यात आली. प्रास्ताविक सुधीर शेळके यांनी केले. यावेळी लक्ष्मीकांत माळवदकर, रमेश फाटले, नगरसेवक अभिषेक पतंगे, गोपीनाथ तेरकर, बंडोपंत तांदळे, राजेंद्र पतंगे यांच्यासह
समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
















