अहमदपूर : प्रतिनिधी
येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व गलथान कारभाराने कळस गाठला असून भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गरीब रुग्णासाठी जीवनदायी ठरणारे हे रुग्णालय सध्या मृत्यूचा सापळा बनत आहे की काय? असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. येथे एकाच महिन्याच्या चक्क डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरासह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून या प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दि. १२ जानेवारी रोजी सिंधुताई येमले वय ३८ रा. सलगरा यांना उलट्या आणि जुलाब होत असल्याने नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या बस स्थानकापासून रुग्णालयापर्यंत स्वत: चालत आल्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काहीं तासातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जी महिला चालत रुग्णालयात येते, तिचा मृत्यू इतक्या तातडीने कसा काय होऊ शकतो?. केवळ डॉक्टरांचा हलगर्जी व निष्काळजीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे
दुस-या घटनेत दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी दिपाली दयानंद वाघमारे वय २३ रा. धानोरा (खुर्द) या नवविवाहितेचा पहिल्या बाळांतपणादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता. गंभीर प्रकृती असतानाही डॉक्टरांकडून व प्रशासनाकडून योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद झाली असून याबाबत माता-मृत्यू अन्वेषण समिती चौकशी करीत असल्याचे प्रशासनाने सांगितले. ही चौकशी मात्र थातूर-मातूर केली जाणार अशी शंका नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आली आहे परंतु ही चौकशी सुरू असतानाच सिंधुताईचा मृत्यू झाल्याने समितीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
या रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक व इतर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका मागोमाग एक महिलांचे बळी जात आहेत अहमदपूरचे ग्रामीण रुग्णालय रुग्णांचा जीव वाचविणसाठी आहे की त्यांना मारण्यासाठी हे मात्र कळायला मार्ग नाही. याची उपसंचालकांकडून सखोल चौकशी होऊन संबंधित दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा धानोरा (खुर्द) व सलगरा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयाकडे जिल्हा शल्य चिकित्सक ढेले व उपसंचालक गायकवाड यांनी वेळीच लक्ष घालून सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

