विधान परिषदेच्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज
मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या ११ जागांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. सकाळी आठ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान होईल. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. महायुतीच्या ६ जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.
निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ मे रोजी निवडणूक जाहीर केली होती. या १७ जागांमध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. ४ जूनला ६ मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ११ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी २२ जूनला होऊन निकाल घोषित केले जातील.
मतदान होणा-या मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात दुरंगी, सात ठिकाणी तिरंगी तर एका मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मतदारांना पक्षादेश (व्हीप) बजावण्यात आला आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर-जालना यासारख्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे सत्ताधारी महायुतीचे पारडे जड आहे.
या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, कटक मंडळाचे सदस्य मतदान करणार आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मतदान करण्यासाठी संबंधित राजकीय पक्षाकडून पक्षादेश जारी करण्यात आला आहे. मतदारांना निवडणुकीत पसंती क्रमाने मतदान करायचे आहे. अधिकृत उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मतदान करण्याची सूचना राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारांना केली आहे.
निवडणूक होत असलेले मतदारसंघ आणि कंसात मतदारांची संख्या
सोलापूर (६१६), सांगली-सातारा (८९५), नांदेड (४४६), भंडारा-गोंदिया (४५७), नाशिक (६१९), जळगाव (६३०), अमरावती (४५३), लातूर -धाराशीव-बीड (९८८), परभणी-हिंगोली (४६६), छत्रपती संभाजीनगर -जालना(६३७) नागपूर (८३६)
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक
स्वराज्य संस्थेसाठी चुरस
धाराशिव : धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी गुरुवार दि. १८ जून रोजी मतदान होत आहे. यासाठी तीनही जिल्ह्यातील २९ तालुक्यांतील २९ मतदान केंद्रावर निवडणूक विभागाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशी दुरंगी लढत होत आहे. महायुतीकडून बसवराज पाटील तर महाविकास आघाडीकडून महेश देशमुख हे रिंगणात आहेत. २२ जूनला निकाल आहे, त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे. महायुतीचे उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील व महाविकास आघाडी कॉंग्रेसचे उमेदवार महेश देशमुख धाराशिव जिल्ह्यातील असून दोघेही उमरगा तालुक्यातील आहेत. दोघांमध्ये सरळ लढत होत असल्याने सामना रंगतदार होत आहे.
















