निलंगा : प्रतिनिधी
येथील उपजिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतानाही २४ तास अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयात सोनोग्राफी सेवा दररोज उपलब्ध नसून एक्स-रे सुविधा केवळ दिवसा सुरू ठेवली जाते. रात्रीच्या वेळी एक्स-रे सेवा बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांच्या नेतृत्वाखाली पदाधिका-यांनी निलंगा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांची भेट घेत विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी रुग्णालयात २४ तास एक्स-रे व सोनोग्राफी सेवा सुरू करण्याबरोबरच कायमस्वरूपी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांचे लेखी निवेदनही प्रशासनाला देण्यात आले. गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी लातूर येथे रेफर करण्यात आल्यानंतर १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी यावेळी पुराव्यासह मांडण्यात आल्या. नमूद क्रमांकावर संपर्क साधूनही अनेकदा तासंतास रुग्णवाहिका मिळत नसल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे डॉ. भिकाने यांनी सांगितले तसेच संबंधित १०८ रुग्णवाहिका यंत्रणेशी फोनवर संपर्क साधून त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी डॉ. नरसिंह भिकाने यांनी, ‘यापुढे १०८ रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही किंवा रुग्णालय प्रशासनाने पर्यायी रुग्णवाहिका पुरवली नाही आणि त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला तर त्यास रुग्णालय प्रशासन जबाबदार राहील, अशा परिस्थितीत मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,’ असा इशारा देण्यात आला.
सध्या निलंगा तालुक्यातील नागरिकांना रात्रीच्या एक्स-रे व २४ तास सोनोग्राफी सुविधेसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेषत: ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना याचा मोठा फटका बसत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.यावेळी मनसे तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार, शहराध्यक्ष अबू बकर सय्यद, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष सदाशिव हाडोळे, तालुका उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, संतोष जाधव, बालाजी पवार, तालुका सचिव गणेश उसनाळे, प्रमोद हाडोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
















