वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
एच-वनबी व्हिसाचे शुल्क तब्बल १ लाख डॉलर्स म्हणजेच ८८ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले होते. त्यामुळे भारताला या निर्णयाचा मोठा फटका बसला होता. दरम्यान, आता ट्रम्प सरकारने याच एच-१बी व्हिसासंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या सिटिझनशीप अँड इमिग्रशन सर्व्हिस विभागाने एच-१बी होल्डर्सना मोठा दिलासा दिला आहे. आता ज्या लोकांकडे एच-१बी व्हिसा आहे आणि त्यांना फक्त व्हिसाचे स्टेटस बदलायचे आहे, त्यांना एक लाख डॉलर्स फी देण्याची गरज नाही. नव्या गाईडलाईन्सनुसार एफ-१ आणि एल-१ व्हिसा असणा-या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हिसाचे स्टेटस बदलायचे असेल तर त्यांना कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. सोबतच एच-१बी व्हिसा असलेल्यांना त्यांच्या व्हिसाचे नुतनीकरण करायचे असेल तर वाढीव शुल्क द्यावे लागणार नाही.
व्हिसासंदर्भात जारी नव्या गाईडलाईन्सनुसार ज्यांच्याकडे अगोदपासूनच एच-१बी व्हिसा आहे, त्यांना फी म्हणून एक लाख डॉलर्स देण्याची गरज नाही. सोबतच एच-१बी व्हिसासाठी ज्यांनी २१ सप्टेंबरच्या अगोदर अर्ज केलेला आहे, त्यांना देखील १ लाख डॉलर्स फी देण्याची गरज नाही. सोबतच ज्या विद्यार्थ्याकडे किंवा कर्मचा-याकडे एफ-१, एल-१ व्हिसा असेल आणि त्यांना आपला व्हिसा एच-१बी व्हिसामध्ये बदलायचा असेल त्यांनादेखील एक लाख डॉलर्स फी देण्याची गरज नाही. एखाद्या
व्यक्तीच्या एफ-१ किंवा एल-१ व्हिसाची मुदत संपल्यामुळे संबंधित व्यक्ती अमेरिका सोडून गेलेली असेल आणि त्या व्यक्तीला पुन्हा एच-१बी व्हिसा हवा असेल तर त्या व्यक्तीला देखील एक लाख डॉलर्स फी देण्याची गरज नाही. दरम्यान, ट्रम्प सरकारने जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्समुळे भारतासह जगभरातील लोकांना फायदा होणार आहे.

