नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे माजी एडीसी मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी लष्करी सेवेतून निवृत्ती घेतल्याने मोठी चर्चा रंगली होती. राष्ट्रपतींच्या एडीसीपदावर असताना ते सोशल मीडियावरही चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, अचानक घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामागे नेमके कारण काय, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता मेजर ऋषभ यांनी एका पॉडकास्टमध्ये या निर्णयामागची वैयक्तिक कारणे सांगितली आहेत. यात विशेष म्हणजे एडीसीला लग्न करता येत नसल्याचे त्यांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे.
मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितले की, लष्करात जाणे त्यांच्यासाठी केवळ करिअर नव्हते, तर बालपणापासून पाहिलेले एक स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयुष्यातील एक दशकाहून अधिक काळ घालवला. त्यामुळे लष्करी सेवा सोडण्याचा विचार त्यांनी कधीच केला नव्हता.
मात्र, एका टप्प्यावर त्यांच्यासमोर स्वत:च्या महत्त्वाकांक्षा आणि आई-वडिलांप्रती असलेल्या जबाबदा-या यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली. ऋषभ यांनी सांगितले की, या कठीण प्रसंगी त्यांनी स्वत:च्या करिअरपेक्षा आई-वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, आयुष्यात काही गोष्टींसाठी त्याग करावा लागतो आणि पालकांसाठी केलेला त्याग यापेक्षा मोठा असू शकत नाही. एक मुलगा म्हणून माझ्या काही जबाबदा-या आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत. मला निर्णय घ्यायचा होता. मला काहीतरी त्याग करावा लागणार होता. मला स्वत:ची निवड करायची होती किंवा माझ्या आई-वडिलांची. मला स्वार्थी व्हायचे नव्हते. ‘मी ते केले असते तर’ या विचारात मला आयुष्य घालवायचे नव्हते.
कुटुंबाशी चर्चा करून घेतला निर्णय
लष्करातून निवृत्ती घेण्याचा निर्णय अचानक किंवा घाईघाईने घेतलेला नव्हता, असंही ऋषभ यांनी स्पष्ट केलं. कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर आणि सर्व बाजूंचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला. लष्करी कारकिर्दीचा शेवट अपेक्षेपेक्षा लवकर झाला असला, तरी देशसेवेत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आपल्याला अभिमान असल्याचं त्यांनी सांगितले.
एडीसी पदावर असताना अनेक बंधने
राष्ट्रपतींचे अऊउ म्हणून काम करताना अत्यंत कठोर प्रोटोकॉल आणि शिस्तीचे पालन करावे लागते. या काळात वैयक्तिक आयुष्यावरही अनेक मर्यादा येतात, असे ऋषभ यांनी सांगितले. एडीसी म्हणून काम करताना लग्नासंदर्भातही कठोर नियम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्यकाळात एडीसीला लग्न करण्याची परवानगी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘लग्नासाठी निवृत्ती घेतली’ या चर्चेलाही पूर्णविराम
ऋषभ सिंह यांच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियावर लग्नामुळे त्यांनी लष्कर सोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यांनी या चर्चांना स्पष्ट शब्दांत नकार दिला.
आपलं अद्याप लग्न झालेले नाही आणि सध्या लग्न करण्याचाही कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीचा निर्णय लग्नाशी संबंधित असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.
















