गंभीर आरोपानंतर केंद्रीय शिक्षण विभागाची कारवाई
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नीट यूजी परीक्षेतील पेपर फुटीच्या मुद्यावर कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने काल शिक्षण खात्याचे सचिव बदलले. लाखो विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने भरती आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने कठोर निर्णय घेत एनटीएचे ४७ अधिकारी बडतर्फ केल्याची सूत्रांची माहिती आहे. यासोबतच काही अधिका-यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते.
एनटीएमधील मोठ्या सुधारणा आणि उत्तरादायित्व निश्चित करण्यासाठीच्या एका मोठ्या अभियानाचा भाग असल्याचे समजते. येणा-या कालावधीत यंत्रणेत आणखी महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येतील, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. पेपर लीकच्या घटना आणि त्यामुळे रद्द झालेल्या परीक्षा यामुळे एटीए सातत्याने वादात राहिली. यामुळे शिक्षण मंत्रालय अडचणीत आले आहे. पण सरकार शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, पेपरफुटी आणि गैरप्रकारातील सहभागी अधिका-यांवर कारवाईसोबत गुन्हेही दाखल होऊ शकतात.
एनटीएची रचना
बदलली जाणार
शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनुसार बडतर्फीची कारवाई एनटीएचे प्रशासन आणि कामकाजाची रचना नव्याने तयार केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेल्या एजन्सीच्या फेररचनेची कालमर्यादा निश्चित केली आहे. सरकार पुढील एक महिन्यात एनटीएची कार्यप्रणाली, अधिका-यांची जबाबदारी, अंतर्गत व्यवस्थापन बदलण्याची शक्यता आहे.
















