कायद्याची अंमलबजावणी रोखल्याचा आरोप
पुणे : प्रतिनिधी
एफडीएने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून रोखले जात असल्याचा आणि अधिकार हिरावून घेतले जात असल्याचा एफडीएने दावा केला आहे. एफएसएसएआयने घटनाबा पद्धतीने समांतर अंमलबजावणी यंत्रणा निर्माण केली असून, त्याद्वारे राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याचा एफडीएचा दावा आहे.
एफएसएसएआयच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी ‘केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी’ आणि ‘केंद्रीय परवाना प्राधिकरण’ यांसारखी पदे निर्माण करून आपल्या अधिकारांचा बेकायदेशीरपणे वापर केल्याचे याचिकेत म्हटले असून ही पदे अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या वैधानिक चौकटीत बसत नसल्याचा एफडीएचा दावा आहे.
अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ चा उद्देश अन्न नियमनाचे विकेंद्रीकरण करणे हा होता, असा दावाही एफडीएकडून याचिकेत करण्यात आला आहे. यापूर्वी या कायद्याची अंमलबजावणी राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त आणि नियुक्त अधिकारी यांच्यामार्फत केली जात होती, असेही एफडीएने म्हटले आहे. मात्र, त्यानंतर केंद्र सरकार आणि एफएसएसएआय यांनी कायद्यात विविध सुधारणा केल्या. या सुधारणांमुळे विकेंद्रित अंमलबजावणी व्यवस्था हळूहळू मोडीत काढली जात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला.
२६ नोव्हेंबरला पार
पडणार सुनावणी
घटनाबा सुधारणा आणि नियम रद्द करण्याची तसेच, केंद्रीय परवाना असलेल्या आस्थापनांची तपासणी करण्यापासून राज्याच्या अधिका-यांना रोखणा-या मे २०२३ मधील आदेशाला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबरला मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे.
















