छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आपल्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी वादात सापडलेले एमआयएमचे छत्रपती संभाजीनगर येथील नगरसेवक मतीन खान यांचा एक आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या व्हीडीओत ते एका तरुणीला व्हीडीओ कॉलवर कपडे काढण्याचा इशारा देत आहेत. अनेक सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नाशिक व छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री केलेल्या एका संयुक्त कारवाईत निदा खानला अटक केली. निदा खान ही नगरसेवक मतीन पटेल यांच्या नारेगाव परिसरातील एका घरात लपून बसली होती. हे घर त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. आता मतीन पटेल यांच्यावर निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांचा मोबाईल फोनही जप्त केला आहे. यामुळे मतीन पटेल यांचा पाय खोलात गेल्याची चर्चा असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
वादग्रस्त व्हीडीओ सकल हिंदू समाज मुंबई या फेसबुक पेजवरून व्हायरल करण्यात आला आहे. त्यात मतीन पटेल व एक तरुणी दिसून येत आहे. व्हीडीओत मतीन हा सदर तरुणीला कपडे काढण्याची सूचना करतो. त्यानंतर ती तरुणी तो सांगेल त्याप्रमाणे करते. सकल हिंदू समाजाने या व्हीडीओवर तीव्र संताप व्यक्त करत मतीन पटेल यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मतीन पटेल यांनी सदर तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याकडून असे कृत्य करून घेतल्याचा आरोप यासंबंधी केला जात आहे. तसेच त्यांची नगरसेवक पदावरून हकालपट्टी करण्याची मागणीही या प्रकरणी केली जात आहे
मतीन पटेल हे एमआयएमचे नगरसेवक आहेत. मतीन पटेल हे एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या निकटवर्तीय नगरसेवकांपैकी एक असल्याचे मानले जाते.
















