26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्र‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हार्डवेअर स्पर्धेचा उत्साह

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हार्डवेअर स्पर्धेचा उत्साह

पुणे : प्रतिनिधी
येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल व एआयसीटीई यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२५ (एसआयएच-२०२५) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीत ओप्टीवीस (एआयसीटीई), वेलोट्रीज (रक्षा मंत्रालय) आणि ट्रेलब्रेजर्स (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय) या संघांनी विजेतेपद पटकावले. तर इनो-कोर (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय), क्लच एसआयएच (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय), नेफ्रॉन आणि आरोग्य शिल्ड (दोन्ही केरळ सरकारच्या आरोग्य विभागाचे) यांनी आपापल्या गटात संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला.

एसआयएच-२०२५ या पाच दिवस चाललेल्या राष्ट्रीय हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव निवडलेले नोडल केंद्र होते. यामध्ये देशभरातून आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, केरळ, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील एकूण २५ संघांची निवड झाली होती.

या स्पर्धेदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी एआयसीटीई, रक्षा मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय तसेच केरळ सरकारच्या आरोग्य विभागासमोरील विविध समस्यांवर पर्यायी उपाय सुचवले. अंतिम फेरीत विविध स्तरांवर प्रत्येक गटातील विजेत्या संघांच्या नवकल्पनांचे परीक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले. या सर्व विजेत्या संघांच्या नवकल्पनांना भारत सरकारकडून करंडक, प्रमाणपत्रे व प्रत्येकी दीड लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार डॉ. राघवप्रसाद दास, ‘एआयसीटीई’चे सहाय्यक संचालक डॉ. राकेश कुमार गंजू, आयआयटी मुंबईचे माजी प्राध्यापक डॉ. नरेंद्र शहा, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एसआयएच सेंटर प्रमुख गणेश भिसे, नोडल केंद्र प्रमुख डॉ. निशांत टिकेकर, स्पर्धा संयोजक प्रा. सुरेश कापरे आदी मान्यवर उपस्थित होते. विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कापरे यांनी केले, आभार डॉ. टिकेकर यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. स्नेहा वाघटकर यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR