लातूर : प्रतिनिधी
इंडियन प्रोस्थोडोंटिक सोसायटीच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या २८ व्या राष्ट्रीय प्रोस्थोडोंटिक अधिवेशनात एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील कृत्रिम दंत रोपण विभागातील एम. डी. एस. पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. सागरिका मिसाळ, डॉ. अव्दैता आवाळे व डॉ. श्वेता मिश्रा यांच्या संशोधनास प्रथम पारितोषिक मिळाले आहे. या यशाबद्दल एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते सर्व विजेत्या संशोधकांचा गौरव करण्यात आला.
बेळगांव येथे पार पडलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय प्रोस्थोडोंटिक्स अधिवेशनातील दुस-या सत्रात डॉ. सागरिका मिसाळ आणि डॉ. अव्दैता आवाळे यांनी सुरक्षित प्टेरीगॉइड इम्प्लांट बसविण्यासाठी प्टेरीगोमॅक्सिलरी जंक्शन व मॅक्सिलरी ट्युबेरोसिटी यांचा त्रिमितीय अभ्यास या विषयावर सादर केलेल्या शोध निबंधास प्रथम पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर तिस-या सत्रात डॉ. श्वेता मिश्रा यांनी ‘चेह-यावरील संदर्भ रेषांमध्ये विसंगती असल्यास ऑक्लूजल प्लेन निश्चितीसाठी चिकित्सीय मार्गदर्शक कार्यपद्धती’ या विषयावर सादर केलेल्या शोध निबंधासही प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
या परिषदेत राष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक व्याख्याने, थेट प्रात्यक्षिक, रिसर्च पेपर, रिसर्च पोस्टर व टेबल क्लिनिक अशा स्पर्धक उपक्रमांचा समावेश होता. परिषदेतील विजेत्या सर्व संशोधकांचा मान्यवारांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील कृत्रिम दंत रोपण विभागातील एम.डी.एस. पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. योगिनी शेंडे, डॉ. यश भिकाणे, डॉ. अक्षय मुचाटे, डॉ. श्रेयस मगर, डॉ. समर्थ रेवडकरी, डॉ. प्रशांत घोगरे, डॉ. वेदिका देशमुख यांच्यासह देशभरातील अनेक प्रख्यात प्रोस्थोडोंटिस्ट यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या यशाबद्दल सर्व विजेत्या संशोधकांचे एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, उप प्राचार्य डॉ. यतिशकुमार जोशी, प्रोस्थोडोंटिक्स विभाग प्रमुख डॉ. सुशैन गाजरे, डॉ. भूषण बांगर, डॉ. शशी पाटील, डॉ. शितल वाघ, डॉ. विद्या वायबसे, डॉ. योगेश नागरगोजे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून कौतुक होत आहे.
















