अध्यक्षपदी न्या. भोसले, सचिवपदी तुकाराम मुंढे
एमपीएससी अध्यक्षांचा
राजीनामा घेण्यास नकार
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोगाची स्थापना करण्यात येणार असून, आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची तर सचिवपदी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी केली. यात २ महिन्यांत चौकशी करण्याचा प्रस्ताव असून, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि २०२७ मधील गट-क परीक्षेतील पदसंख्या दुप्पट करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. परंतु एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेण्याची मागणी अमान्य केली. दरम्यान, आ. रोहित पवार यांनी भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, असे म्हटले.
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या ११ दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरू ठेवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीममवार यांचा राजीनामा घ्यावा, ही त्यामधील प्रमुख मागणी आहे. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी आता हे आंदोलन मागे घ्यावे, यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी रविवारी सायंकाळी आ. रोहित पवार आणि आंदोलकांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवेंद्रराजे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले आणि आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन केले. या आयोगाचे कामकाज सुरू असेपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना पदावरून दूर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पेपरफुटीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्या. दिलीप भोसले तर सचिवपदी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह माजी न्यायाधीश पी. डी. नाईक, पोलिस महानिरीक्षक लखमी गौतम, सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचा समावेश आहे, असे सांगत शिवेंद्रराजेंनी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचा मसुदा रोहित पवारांकडे सुपूर्द केला. यामध्ये अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याविषयी काही उल्लेख नव्हता. त्यामुळे विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवारांनी केली.
सरकार गुन्हे मागे घेणार
आंदोलन करणा-या ज्या-ज्या विद्यार्थांवर गुन्हे नोंद करण्यात आले, ते गुन्हे मागे घेण्याची घोषणा शिवेंद्रराजेंनी केली. तसेच एमपीएससी संदर्भात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही शिवेंद्रराजे म्हणाले. येणा-या काळात गट क पदांसाठी परीक्षा होणार असून त्याच्या संख्येत वाढ होणार असल्याचेही ते म्हणाले.
















