23.2 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeलातूरएलडीसीसी आयएमए रनथॉन २०२६ स्पर्धा उत्साहात 

एलडीसीसी आयएमए रनथॉन २०२६ स्पर्धा उत्साहात 

लातूर : प्रतिनिधी
निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी आणि आरोग्यजागृतीचा प्रभावी संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली एलडीसीसी आयएमए रनथॉन २०२६ लातूरमध्ये मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडली. तब्बल १७०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत ‘‘निरोगी लातूर’’ या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हा उपक्रम केवळ एका संस्थेचा नसून संपूर्ण लातूर जिल्ह्यातील नागरिकांचा असल्याचे प्रतिपादन (आयएमए) लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अभय कदम यांनी केले. ‘‘माणसाच्या आरोग्याची काळजी घेणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक नागरिक तंदुरुस्त असेल तरच समाज निरोगी राहू शकतो. जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती यांच्या माध्यमातूनच आरोग्यदायी परिवर्तन घडू शकते,’’ असे ते म्हणाले.
या रनथॉनमध्ये २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी अशा विविध गटांचा समावेश होता. पाच वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने धाव घेतली. महिलांचा लक्षणीय सहभाग ही या स्पर्धेची विशेष बाब ठरली. देगलूर (जि. नांदेड) येथील दहा वर्षांच्या मुलाने २१ किमी गटात उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.
या उपक्रमासाठी लातूर जिल्हा मध्यवृत्ती सहकारी बँक, महेश अर्बन बँक, समित इंटरनॅशनल स्कूल, बिडवे लॉन्स, मोटेगावकर सरांचे आरसीसी, भारती व गीते ग्रुप, क्वालिटेक ग्रुप यांचे सहकार्य लाभले. आयोजन यशस्वी करण्यासाठी डॉ. ज्योती सुळ, डॉ. प्रियांका डावळे, डॉ. ऋषिकेश हरिदास तसेच डॉ. अजय जाधव, डॉ. वैशाली टेकाळे, डॉ. चांद पटेल, डॉ. आरती झंवर, डॉ. ब्रिज झंवर, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. अर्चना कोंबडे, डॉ. माधुरी कदम, डॉ. प्रणिता नागोरे, डॉ. शीतल टिके, डॉ. स्वप्नात निलंगेकर, डॉ. आशिष चेपूरे, डॉ. हनुमंत किनीकर आदींनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचे उद्घाटन लातूरच्या जिल्हाधिकारी डॉ. वर्षा ठाकूर घुगे व जिल्हा  मध्यवर्ती बँकेचे  उपाध्यक्ष  प्रमोद  जाधव यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण समारंभास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख , दिलीप माने,आरसीसी क्लासेस चे संचालक शिवराज मोटेगावकर, नागनाथ गिते, धर्मवीर भारती, बबन भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
‘‘आपले आरोग्य, आपली जबाबदारी’’ हा संदेश देणारी ही रनथॉन लातूरकरांसाठी प्रेरणादायी ठरली. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार केल्यास निरोगी समाज घडू शकतो, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आरोग्याविषयीची जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी दाखवून दिली. भविष्यातही अशा उपक्रमांतून निरोगी समाज घडविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR