मुंबई : प्रतिनिधी
आपण जिची आतुरतेने वाट पाहत आहोत, ती एसटी बस नेमकी कुठे आहे, हे प्रवाशांना माहीत व्हावे म्हणून मोबाईल अॅप सेवा १५ ऑगस्टला सुरू करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती, मात्र अद्याप ती सेवा सुरू न झाल्याने अधिका-यांना त्यांच्याच घोषणेचा विसर पडल्याचे चित्र आहे.
एसटीची श्वेतपत्रिका जाहीर करताना जूनमध्ये प्रस्तुत प्रतिनिधीने मंत्री सरनाईक यांना अॅप सेवेविषयी विचारले असता त्यांनी संबंधित अधिका-यांच्या हवाल्याने १५ ऑगस्टचा मुहूर्त दिला होता. या सेवेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे एप्रिलमध्ये सांगण्यात आले होते, तर सर्व काम पूर्ण झाले असून १५ ऑगस्ट रोजी ही अॅपसेवा सुरू करणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी म्हटले होते.
कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण न केल्यास त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते. २०१९ पासून या अॅपचे काम सुरू असून, ते सहा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते.
प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावर असलेला ट्रिप कोड एसटीच्या अॅप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लोकेशन समजू शकेल.
त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ, त्या सर्व गाड्यांच्या थांब्याचीही माहितीही मिळणार आहे. नियंत्रणासाठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
















