Homeमहाराष्ट्रएसटीच्या विलीनीकरणाबाबत सरकार गप्प का? : विजय वडेट्टीवार

एसटीच्या विलीनीकरणाबाबत सरकार गप्प का? : विजय वडेट्टीवार

मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सत्तेत असताना गोपीचंद पडळकर, सदावर्ते यांना हाताशी धरून एसटी कर्मचा-यांचा संप करण्यात आला होता. जे महायुती सरकारला जमले नाही तेलंगणा सरकारने ते करून दाखवले आहे. तेलंगणा सरकारने एसटीचे विलीनीकरण केले, कर्मचा-यांच्या ३१ मागण्या मान्य केल्या. त्यांच्या कामाच्या वेळा कमी केल्या, पगारवाढ दिली, नोकरीत नियमितीकरण केले. तर महाराष्ट्रात हे का होऊ शकत नाही?, अशी विचारणा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असताना विलीनीकरणाच्या मागणीवर भाजपाचा घसा का सुकला? एसटी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. विरोधी पक्षात असताना एसटीच्या विलीनीकरणासाठी जे ओरडत होते, ते आता सत्तेत आल्यावर मूग गिळून गप्प का आहेत? सत्तेची ऊब मिळाल्यावर भाजपला एसटी कामगारांच्या संघर्षाचा विसर पडला आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अवमान करणा-यांना अभय देण्यासाठी सत्तेत बसले आहे काय? ज्याला महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, ज्याची अक्कल कवडीची आहे, अशा भोंदू माणसाने महाराजांवर भाष्य करण्याची हिंमत कशी केली? छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे झुकले असते तर स्वराज्य निर्माण झाले नसते. सत्तेत बसलेले लोक या बाबांच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच या भोंदूंची मस्ती वाढली आहे आणि ते महाराजांचा अपमान करतात. जेव्हा या भोंदूने महाराजांचा अपमान केला तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी का थांबवले नाही? नंतर बोलून उपयोग नाही. तसेच, संजय गायकवाडसारखे शिवप्रेमी आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत? आता का बोलत नाहीत, शिव्या देत नाहीत, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

दरम्यान, चंद्रपूरच्या राजकारणावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, आमच्या काही चुकांमुळे सत्ता गेली असेल, पण आता चित्र बदलले आहे. महापालिकेत फक्त २४ नगरसेवक सोडले तर ४२ नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. महापौर उतरवण्याची तयारी पूर्ण झाली असून, लवकरच चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता दिसेल. भाजपाचा बालेकिल्ला ढासळायला वेळ लागणार नाही असा इशारा काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR