19.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचा-यांच्या संपामुळे १५ कोटींचे नुकसान

एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे १५ कोटींचे नुकसान

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने एसटीच्या संपकरी कर्मचा-यांवर कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. तरीसुद्धा संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या संदर्भात आज मुख्यमंत्री सायंकाळी ७ वाजता ‘सह्याद्री’ निवासस्थानी एसटी कर्मचारी कृति समितीसोबत चर्चा करून तोडगा काढणार आहेत.

संपाच्या पहिल्या दिवशी ११ हजार ९४३ फे-या रद्द-
शासकीय कर्मचा-यांप्रमाणे एसटी कर्मचा-यांना सुद्धा वेतन मिळावे आणि इतर मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांच्या ११ संघटनांनी मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. पहिल्याच दिवशी राज्यभरात सुमारे ५० टक्के बससेवा ठप्प झाली. राज्यातील एकूण २५१ आगारांपैकी ५९ आगारांमध्ये पूर्णत: काम बंद आंदोलन करण्यात आले. तर ७७ आगारे अंशत: बंद होती. या कारणाने राज्यात बसच्या एकूण ११ हजार ९४३ फे-या रद्द करण्याची नामुष्की एसटी महामंडळावर ओढवली. यामुळे एसटी महामंडळाचा एका दिवसात तब्बल १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला. दुसरीकडे या संपामुळे प्रवाशांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

संप मागे घ्या, चर्चेतून प्रश्न सुटेल : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचारी संघटनांना त्यांच्या ‘सह्याद्री’ या शासकीय निवासस्थानी आज चर्चेचे आमंत्रण दिले आहे. यामधून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, या बैठकीत सकारात्मक चर्चा होईल. गणेशोत्सव जवळ आला असल्याकारणाने अनेक नागरिक खरेदी-विक्री करण्यासाठी बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर करत असतात. याकरता माझे एसटी कर्मचा-यांना आवाहन आहे की, त्यांनी संप करू नये. याबाबत सकारात्मक चर्चा करून आणि चर्चेतून प्रश्न सुटेल.

पडळकर, खोत यांचा संपाला पाठिंबा
एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या या संपाला सत्ताधारी पक्षातील आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. आमदार पडळकर आणि आमदार खोत यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढू, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. परंतु वेतनवाढ झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे पडळकर यांनी सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR