निलंगा : लक्ष्मण पाटील
राज्यात दुष्काळाचे संकट गडद होत असताना ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील मजूर, कामगार आणि हातावर पोट असणा-या कुटुंबांसमोरही उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. कामे ठप्प होत असताना दोन वेळच्या जेवणाची चिंता वाढलेल्या गरजूंसाठी शिवभोजन थाळी हा आधार ठरू शकतो. मात्र, याच काळात शिवभोजन योजनेवर नव्या नियमावलीचे निर्बंध लागू झाल्याने गरजूंच्या ताटापर्यंत पोहोचणारी योजना कागदी नियमांच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शिवभोजन योजनेसंदर्भातील जुन्या शासन निर्णयांचे एकत्रीकरण करून नवी नियमावली जारी केली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास दररोज ५ हजार रुपयांचा दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे केंद्रचालकांवर नियंत्रण राहणार असले तरी नियमांची अंमलबजावणी करताना योजनेचा मूळ उद्देश गरजूला परवडणारे अन्न उपलब्ध करून देणे दुय्यम ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निलंगा शहरात शिवभोजन केंद्र सध्या चालकाकडून चालविले जात नसल्याने बंद असल्याची माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी दिली. एकीकडे दुष्काळामुळे हाताला काम नाही, दुसरीकडे महागाईने सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शहरातील शिवभोजन केंद्र बंद राहणे ही गरजूंसाठी चिंतेची बाब आहे.
















