बारामती : प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची घोषणा झालेली असून २ डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार आहे. असे असतानाच दुसरीकडे राज्यसभा खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात एका खास सोहळ्याची लगबग असणार आहे. संपूर्ण पवार कुटुंब या सोहळ्यानिमित्त राजकीय मतभेद विसरुन एकाच मंचावर दिसणार आहे.
युगेंद्र पवारांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण कोणतं असणार म्हणजेच वेडिंग डेस्टिनेशन कोणतं ही माहिती समोर आली आहे. युगेंद्र पवार हे बारामती नगरपरिषदेची निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांची आत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभेला चुलते अजित पवार यांच्याविरुद्ध बारामती मतदारसंघातून उभे राहिलेले युगेंद्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींपासून खासगी कारणामुळे दूर राहणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच युगेंद्र यांचा तनिष्का कुलकर्णीशी साखरपुडा झाला आहे. आता या दोघांच्या लग्नाची तारीख आणि लग्न कुठे असणार आहे हे सुद्धा समोर आले आहे.
३० नोव्हेंबर युगेंद्र पवार विवाहबंधनात
युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा ३० नोव्हेंबर रोजी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पवार कुटुंबाचं मूळ गाव असलेल्या ठिकाणी किंवा कर्मभूमि असलेल्या बारामतीमध्ये हा सोहळा पार पडणार नाही. शरद पवारांच्या नातवाचा विवाह सोहळा मुंबईतील प्रतिष्ठित अशा वांद्रे कुर्ला संकुलात म्हणजेच बीकेसीमध्ये पार पडणार आहे.

