Homeलातूरऐन परीक्षेच्या कालावधीत होणार पट पडताळणी मोहीम 

ऐन परीक्षेच्या कालावधीत होणार पट पडताळणी मोहीम 

जळकोट : प्रतिनिधी
सन २०२५-२६ चे शैक्षणिक सत्र आता याच महिन्यामध्ये संपणार आहे . दि ११ एप्रिलपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी परीक्षेची सुरुवात दि ११ एप्रिलपासून सुरू होत आहे . याच दिवसापासून महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय याच्या वतीने पट पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे आता शाळांना वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी हजेरीपटावर आहेत तेवढे उपस्थित ठेवावे लागणार आहेत .
    शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक शाळेमध्ये दरवर्षी पडताळणी मोहीम हाती घेण्यात येते . दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात वर्गातील उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या मोजली जाते . विद्यार्थी वर्गामध्ये किती हजर आहेत आणि हजेरीपटावर किती आहेत याचा लेखाजोखा घेतला जातो. यासाठी जिल्हा स्तरावरचे अधिकारी तसेच तालुकास्तरावरचे अधिकारी नियुक्त करण्यात येतात. दरवर्षीच विद्यार्थ्यांची पट पडताळणी होते. यावर्षी मात्र महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने दि ११ एप्रिल, १५ एप्रिल तसेच २२ एप्रिल या तीन तारखांना पट पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे .
  इयत्ता दुसरी ते आठवीच्या वर्गाची पटपट तळणी दि ११ एप्रिल तसेच १५ एप्रिल व २२ एप्रिल रोजी होणार आहे तर इयत्ता नववी वर्गाची पट पडताळणी  याच दिवशी होणार आहे . तर इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची पट पडताळणीही याच कालावधीत होणार आहे. या पटपडताळणीच्या अनुषंगाने परीक्षेचे योग्य नियोजन करावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी होणार का याकडेही लक्ष लागले होते परंतु या वर्गाच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा  झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची पट पडताळणी करण्याची आवश्यकता नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे .
  या पट पडताळणीसाठी पुरेसे मनुष्यबळही आवश्यक्य आहे. यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक, लेखाधिकारी अधीक्षक शालेय पोषण आहार, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधीव्याख्याता, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकचे अध्यक्ष व विस्ताराधिकारी इत्यादींची नेमणूक करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR