मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापतिपदाचा अर्जही भरला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, माझा भाजप आणि संघाच्या लोकांना सवाल आहे की, एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसवून घेतले आहेत, त्यात अजून उपसभापतिपदावर बसवले आहे. का नाही कोणी भाजपचा तिथे बसलेला आहे? आज इतके वर्ष घरदार सोडून भाजपसाठी काम करणारे लोक आहेत, त्यांना का नाही बसवले? हे उपरे का बसवून घेतले? याचा भाजपने विचार केला पाहिजे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे.
गेले ४ दिवस आम्ही पाहत आहोत, ज्या लोकांना सगळं काही मिळतं तेच स्वत:च्या स्वार्थासाठी निघून जात आहेत. यात धक्का बसण्यासारखे काही नाही. वरळी, शिवडी हा आमचा बालेकिल्ला आहे आणि तिथे आमचे काम बोलते. पण एकच दुर्दैव आहे की ज्यांना आम्ही सगळे काही दिले, बरं ही एक व्यक्ती अशी आहे की आदित्य ठाकरे भेटत नाही, असं नव्हतं. परवा येताना आम्ही पुण्यातून सोबतच आलो. एवढे असूनही तुम्हाला अजून काय पाहिजे आहे, अजून किती ओरबाडणार आहात?
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, स्वत: आमदार आहेत, जी प्रभाग समिती आहे त्यांच्या मुलीला आम्ही एनजीओचा जो कोटा असतो त्यातून समिती दिली आहे. कामगार सेनेत पद दिले होते, शिवसेनेत पद दिले होते. एवढे सगळे होऊन देखील बीएससी तर आहेच, अजून तुम्हाला काय पाहिजे? आम्ही काही कमी दिलं का? रोज भेटत होतो? रोज काय करायचे होते तुमच्यासाठी? आरत्या करायच्या होत्या का? असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.
मंदिरे लुटणा-यांसोबत तुम्ही कसे बसू शकता?
लोकशाहीचे काय होणार, संविधानाचे काय होणार, असे अनेक विचार आहेत. मला सचिन भाऊ यांना देखील प्रश्न विचारायचा आहे की, जे आपली मंदिरे लुटत आहेत, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा केला, अयोध्यामध्ये जमीन घोटाळा केला, अशी हिंदू मंदिरे लुटणा-यांसोबत तुम्ही कसे बसू शकता? संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासोबत कसे बसू शकता? हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे, हे आम्हाला अभ्यास केल्यानंतर समजले आहे.
वरळीमध्ये जरी ते उभे राहिले तरी फरक नाही पडणार
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, वरळीमध्ये जरी ते उभे राहिले तरी फरक नाही पडणार. मला सकाळीच त्यांनी मेसेज केला की विरोधात उभा नाही राहणार, पण या बोलायच्या गोष्टी असतात. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की वाराणसीमध्ये सुद्धा एकाला तीन वेळेस मागे जावे लागले होते. आज मी परत एकदा विचारत आहे की ज्यांनी राम मंदिराच्या नावावर दंगली घडवल्या, आंदोलन करायला लावले, तेच आज राम मंदिर लुटत आहेत.
संजय राऊत यांचाही निशाणा
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सचिन अहिर यांच्या पक्ष सोडण्यावर टीका केली. संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?, पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेइमानीचा किडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचे दु:ख का करावे?’
















