निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात पुन्हा पावसाने हाहाकार माजवत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने चोहीकडे पाणी झाले आहे. रस्त्यांना अक्षरशा तलावाचे स्वरूप आले आहे. तसेच माकणी येथील तेरणा नदीतील प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर औराद शहाजानी येथे ४० मिनिटांमध्ये ५६ मिमी पाऊस झाला असल्याचे हवामान माफक केंद्राचे मुकरम नाईकवाडे यांनी सांगितले.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरातील गावांमध्ये रविवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे रस्त्याला तलावाचे रूप आले तर चोहीकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती या भागाची झाली आहे. निम्न मांजरा धरणानंतर तेरणा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा सोडण्यात आलेला आहे . तसेच औराद परिसरात ढगफुटीसारखा पाऊस सुरू असल्याने सर्वच बंधा-याची दारे उघडण्यात आली आहेत. यामुळे मध्यरात्रीपर्यंत मोठा पाण्याचा प्रवाह नदी पात्रात येणार असल्याने शेतकरी बांधवांनी आपले पशुधन सुरक्षित ठेवून गरज नसताना घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
लातूर-जहिराबाद महामार्गावर पाणी
ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसामुळे औराद येथील लातूर-जहीराबाद या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने अनेक काळ वाहतुकीची कोंडी झाली. याशिवाय सकल भागातील व महामार्ग लगत असलेल्या व्यापा-याच्या दुकानात व घरामध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे तर औराद शहरांमध्ये जाणा-या बस स्थानकाजवळील ओढ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शहरात जाणा-या रस्त्याची कोंडी निर्माण झाली आहे.याविषयी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याशी विचारणा केली असता तालुक्यात अद्याप जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे एकमतशी बोलताना सांगितले.
















