निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार येथे नवीन शेतकरी भवन बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली असून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नाने शेतकरी भवनासाठी १ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतक-यातून समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेऊन आलेल्या शेतक-यांना मुक्कामाची सोय व्हावी व शेतक-यांना मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून औराद शहाजानी येथे शेतकरी भवन उभारण्यासाठी माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शब्द दिला होता. त्यानुषंगाने शेतकरी भवन उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून त्याबाबतचा प्रस्ताव पणन विभागाकडे पाठविण्यात आला होता. आ. निलंगेकर यांनी याबाबत पाठपुरावा करून औराद येथे शेतकरी भवन उभारण्यासाठी १ कोटी ५२ लाख रुपये मंजूर करुन घेतले. त्याबाबतची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. एक वर्षाच्या आत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे शेतक-याची सोय होणार असल्याने शेतक-यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

